नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात नागरिकांना मास्क वापराबाबत आवाहन करण्यात यावे आणि सूचनांचे पालन न करणाऱ्या विरोधात दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस उपजिल्हाधिकारी बबन काकडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ आदी उपस्थित होते.
डॉ.भारुड म्हणाले, शारिरीक अंतर आणि मास्कचा वापर करूनच कोरोनाचा संसर्ग नियंत्रीत करता येईल. कार्यालयात देखील प्रत्येक कर्मचाऱ्यास मास्कचा वापर बंधनकारक करण्यात यावा. वाहनाने जाताना देखील मास्क घालणे आवश्यक आहे. सॅनिटायझरचा वापर आणि हात धुण्याचे महत्व देखील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात यावे. त्यासाठी शहरी भागातील प्रतिबंधीत क्षेत्रात दिवसातून दोनदा ध्वनीक्षेपकाद्वारे माहिती देण्यात यावी. ग्रामीण भागात देखील दवंडीच्या माध्यमातून माहिती द्यावी. मास्कचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी कोरोना सुरक्षा पथक स्थापन करावे.
ग्रामीण भागात खाजगी दवाखाने आणि आरोग्य केंद्र सुरळीतपणे सुरू राहील याची दक्षता घेण्यात यावी. कोरोनाबाधीत रुग्णाची संपर्क साखळी शोधण्यावर विशेष लक्ष द्यावे. क्वारंटाईन केंद्राची व्यवस्था चांगली राहील याकडेही लक्ष देण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.
बाहेरील राज्यात कामासाठी जावून लॉकडाऊन दरम्यान परतलेले जिल्ह्यातील नागरिक आणि याच काळात जिल्ह्यात वास्तव्यास असलेले परराज्यातील मजूर किंवा लहान व्यावसायीक यांची माहिती विहीत नमुन्यात तातडीने भरून द्यावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
बैठकीस नगर पालिकेचे मुख्याधिकारी आणि गटविकास अधिकारी उपस्थित होते.