नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता नंदुरबार जिल्ह्यात 1 एप्रिल ते 15 एप्रिल 2021 या संचारबंदी कालावधीत काही विशिष्ट बाबींकरिता प्रवास करतांना मुभा देण्यात आली असून मालवाहतूक आणि गॅस वितरणासाठी वेगळ्या पासची आवश्यकता असणार नाही.
लोकसेवा आयोग, विद्यापीठ परीक्षांचे परिक्षार्थीं आणि परीक्षा कामकाजाकरिता नियुक्त अधिकारी कर्मचारी यांना वेगळा पास काढायची आवश्यकता नाही. परिक्षार्थींनी परीक्षेचे हॉल तिकीट जवळ बाळगणे आवश्यक राहील. सर्व शासकीय कार्यालये, वैद्यकीय सेवा आणि बँकेचे व्यवहार सुरळीत सुरू राहणार असल्याने संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना वेगळ्या पासची आवश्यकता नाही, मात्र त्यांनी ओळखपत्र बाळगणे व तपासणी यंत्रणांनी विचारल्यास दाखवणे बंधनकारक राहील. वृत्तपत्र वितरण व छपाईस मुभा दिली असल्याने वेगळ्या पासची आवश्यकता नाही.
दुध वितरकांना सकाळी 7 ते 9 आणि संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत दुध वितरणास परवानगी असेल. दुध वितरकांनी संबंधित तहसिलदार यांचेकडून पास घेणे आवश्यक आहे. लगतचा जिल्हा तसेच राज्यातून जिल्ह्यात शेतीव्यवसायासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांनी शेती व्यवसायासाठी तालुक्याच्या तहसिलदार यांच्याकडून पास प्राप्त करुन घेणे आवश्यक राहील.
पाससाठी आवश्यक कागदपत्रे
जवळच्या नातेवाईकाचे अंत्यसंस्कारासाठी किंवा नोकरीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी पास आवश्यक असून त्यासाठी ओळखपत्र आणि आरटीपीसीआर अहवाल आवश्यक राहील. आरटीपीसीआर अहवाल नसल्यास सीमेवर रॅपीड अँटीजन चाचणी करणे आवश्यक आहे. वैद्यकीय उपचार घेण्याकरिता प्रवासासाठी ओळखपत्र व वैद्यकीय दाखला आवश्यक असेल, असे उपजिल्हाधिकारी तथा कोविड पास वितरण कक्षाचे शा.सं. मोरे यांनी कळविले आहे.