नंदुरबार (जिमाका वृत्त) : जिल्ह्यातील मातामृत्यु आणि त्याचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक जोखीमेखालील गरोदर माता, आजारी बाळाला वेळेवर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याची तत्परता अंगणवाडी सेविकांनी दाखवावी, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागामार्फत यहामोगी सभागृहात अंगणवाडी सेविकांसाठी आयोजित ई-आकार डिजीटील कुशल कार्यशाळेत मार्गदर्शन करताना बोलत होते. या कार्यशाळेला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ सुप्रिया गावित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, कृषी व पशुसंवर्धन सभापती हेमलता शितोळे, महिला व बालविकास अधिकारी राठोड यांच्यासह जिल्ह्यातील सर्व बालविकास अधिकारी आणि अंगणवाडी पर्यवेक्षक उपस्थित होते.
यावेळी पर्यवेक्षेकांच्या समस्या ऐकून घेत त्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन देताना मंत्री डॉ. गावित म्हणाले, एकीकडे अंगणवाडींना सोई-सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात असतांना त्यांनी जिल्ह्यातील प्रत्येक कुपोषित बालक आणि गरोदर मातेची विशेष काळजी घेण्याची गरज व्यक्त केली. जर कुपोषित बालक आणि गरोदर माता यांची नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र आणि रुग्णलायातून आवश्यकतेनुसार तपासणी करुन घेतल्यास निर्माण होणाऱ्या समस्यांचे निराकरण तात्काळ होवून बालमृत्यु सारख्या समस्या वेळीच नियंत्रणात आणता येईल. जिल्हा प्रशासन आता बालमृत्युबाबत कडक धोरण अंमलात आणत असून ज्या अंगणवाडीच्या कार्यक्षेत्रात पहिल्यांदा बालकाचा मृत्यु झाल्यास संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांची एक पगार वाढ आणि दुसऱ्यांदा मृत्यु झाल्यास कामावरुन काढण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
रॉकेट लर्निंग, महिला व बाल विकास विभाग ,जिल्हा परिषद, नंदुरबार यांच्या संयुक्त विघमानाने “ई आकार कुशल अंगणवाडी कार्यक्रम” सुरू करण्यात आला ,या कार्यक्रमा अंतर्गत प्रत्येक बिटनिहाय व्हाट्स अॅप ग्रुप्सस् बनवण्यात आले आहेत. या ग्रुप्सस् मध्ये दररोज एक दिवस आधीच पूर्वनियोजनासाठी बालकांच्या अभ्यासाचे व्हिडीओ स्वयंचलित रित्या येतील,आणि अंगणवाडी सेविकांना डिजिटल स्वरूपात प्रमाणपत्र प्रत्येक आठवड्याला मिळतील. बालकांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण देणे तसेच शिक्षणातील असमानता दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत सेविकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे.