नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात कोरोना संदर्भातील जनजागृतीसाठी आणि घरोघरी सर्वेक्षणासाठी शासनातर्फे ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम राबविण्यात येत असून जिल्ह्यातील सर्व सरपंच आणि ग्रामस्थांनी या मोहिमेत सक्रीय सहभाग नोंदवावा व जिल्ह्याला कोरोनामुक्त करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी पत्राद्वारे केले.
सरपंचांना लिहिलेल्या पत्रात ॲड.पाडवी म्हणतात, येत्या काळात कोरोना आजारासोबत राहावे लागणार आहे. या आजारापासून स्वत:चा बचाव करणे गरजचे झाले आहे. या आजारामुळे अनेक कुटुंबांना दु:खद प्रसंगांना सामोरे जावे लागले आहे.
अर्थव्यवस्थेला हळूहळू रुळावर आणण्यासाठी दुकाने, बाजार, व्यवसाय परत सुरू करण्यावाचून पर्याय नसल्याने नागरिक म्हणून प्रत्येकाकडून जबाबदार वर्तनाची अपेक्षा आहे आणि लोकप्रतिनिधी या नात्याने सरपंचांची भूमीका महत्वाची आहे.
ग्रामीण भागातील कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेता सर्वांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे व त्या अनुरूप नागरिकांचे वर्तन व्हावे यासाठी जनजागृती करावी लागणार आहे. यासाठी 15 सप्टेंबर ते 25 ऑक्टोबर 2020 या कालावधीत ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिम राबविण्यात येणार आहे. कोरोना नियंत्रणात लोकसहभागासाठी ही मोहिम आहे.
या विशेष सर्वेक्षण आणि जनजागृती मोहिमेत आरोग्य शिक्षण, महत्वाचे आरोग्य संदेश, तसेच मधुमेह, हृदयविकार, किडनी आजार यासारख्या आजार असणाऱ्या व्यक्तींचे सर्वेक्षण तसेच कोविड संशयीत रुग्ण शोधण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. लोकप्रतिनिधी या नात्याने सरपंचांनी गावातील सर्व ग्रामस्थांना या मोहिमेत सहभागी होण्यासाठी प्रेरित करावे व कोरोनाला पराभूत करण्यासाठी महत्वाची भूमीका पार पाडावी.
मोहिमेदरम्यान घर, कुटुंब, परिसर, गाव, शहर आणि राष्ट्राच्या हितासाठी फेस मास्कचा वापर करणे, शारीरिक अंतराचे पालन करणे, वारंवार हात धुणे, कमीत कमी प्रवास करणे याबाबत जनजागृती करण्यात यावी. सर्वांनी एकजुटीने, जागरूक राहून, संयमाने या संकटाचा सामना करावा आणि मोहिमेत कर्तव्यभावनेने सहभागी व्हावे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सरपंच आरोग्य पथकांना सहकार्य करतील आणि सर्व मिळून कोरोनावर मात करणे शक्य होईल, असा विश्वासही पालकमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.