नंदुरबार (प्रतिनिधी):- “एक चांगली महिला स्वतःच्या परिवार घडवू शकते आणि सर्वच महिला सक्षम झाल्या तर गाव, तालुका, जिल्हा, राज्य आणि देश घडू शकतो, याची जाणीव ठेवून महिलांनी सक्षम झाले पाहिजे”, असे प्रतिपादन नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी केले. महिलादिन सप्ताहानिमित्त डाएट व शिक्षण विभागातर्फे आयोजित कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट) तसेच प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने युट्युब वाहिनीवरून लाईव्ह वेबिनारचे आयोजन करण्यात आले. या वेबिनार मालिकेचे उद्घाटन राज्य शैक्षणिक संशोधन संस्था महाराष्ट्र राज्य पुणेचे उपसंचालक श्री. विकास गरड यांच्या हस्ते करण्यात आले. शबरी मातेच्या जीवनातील श्रीरामभेटीचा प्रसंग वर्णन करून महिला सक्षमीकरणाचे महत्व विशद करतांनाच महिला दिनाचे औचित्य साधत शिक्षण विभागाने आयोजित केलेला विशेष ऑनलाइन लाइव्ह वेबिनार उपक्रम अत्यंत कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार डॉ. राजेंद्र भारूड यांनी यावेळी बोलताना काढले.
कार्यक्रमाला जिल्हा अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांच्यासह जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रघुनाथ गावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ, डायटचे प्राचार्य डॉ. जे. ओ. भटकर, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. राहुल चौधरी, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी श्री. मच्छीन्द्र कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी वसुमना पंत यांनी त्यांचा प्रेरणादायी प्रवास व दिशा याविषयी अनुभव कथन करताना सांगितले की, महिलांनी स्वतः निर्णय घेणे व त्या निर्णयावर ठाम असणे आवश्यक आहे. स्वतःच्या परिश्रमातून ओळख कशी निर्माण होईल, यासाठी प्रयत्न होणे तेवढेच महत्त्वाचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी बोलतांना शहादा येथील स्त्रीरोग तज्ञ डॉ. स्मिता जैन म्हणाल्या की, महिलांनी आरोग्याच्या दृष्टीने दक्ष राहणे आवश्यक असून, आरोग्य म्हणजे काय हे सांगत आरोग्याची व्याख्या स्पष्ट करून प्रकृतीनुसार आहार घ्यावा, आहारात काय असावे, काय असू नये, तसेच शारीरिक सबलीकरण संदर्भात सविस्तर माहिती विषद केली. यावेळी कायदेतज्ञा ऍड. सीमा खत्री यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा, महिला शोषण विषयक कायदा याविषयी सविस्तर माहिती दिली. महिलांना संरक्षण बाबत नियम व कायद्याचे काटेकोर पालन करणे आवश्यक असून, कामाच्या ठिकाणीदेखील महिलांसाठी कायदे असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थित मान्यवरांचे स्वागत संस्थेच्या अधिव्याख्याता डॉ. वनमाला पवार यांनी केले. या वेबिनार मालिकेचे प्रास्ताविक श्रीमती मीनाक्षी गिरी यांनी केले. या वेबिनारला जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील वरिष्ठ अधिव्याख्याता श्री प्रवीण चव्हाण, श्री रमेश चौधरी, अधिव्याख्याता श्री बी आर पाटील, श्री पंढरीनाथ जाधव, डॉ. संदीप मुळे तसेच विषय सहायक सर्वश्री प्रकाश भामरे, संदीप पाटील, देवेंद्र बोरसे, उदय केदार, श्रीमती अलका पाटील यांनी परिश्रम घेतले. उपस्थितांचे आभार ज्ञानप्रकाश फाऊंडेशनच्या जिल्हा समन्वयक श्रीमती सोनल शिंदे यांनी मानले.