नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यामध्ये मनरेगातून ‘ग्रामसमृद्धी व लखपती शेतकरी’ ही संकल्पना राबविण्यासाठी 26 ते 28 एप्रिल 2021 रोजी दूरदृष्य प्रणालीद्वारे तालुकास्तरीय संवादसभेचे आयोजन करण्यात आले.
प्रत्येक दिवशी दोन तालुक्यासाठी चाळीसगावचे गट विकास अधिकारी नंदकुमार वाळेकर आणि अमळनेरचे गट विकास अधिकारी संदीप वायाळ या अनुभवी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी सादरीकरणाच्या माध्यमातून सोप्या भाषेत संकल्पना समजावून सांगण्यात आली.
संवाद सभांमध्ये संबंधित तालुक्याचे तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, विविध उप अभियंता, वन विभागाचे अधिकारी, ग्रामसेवक, ग्राम रोजगार सेवक आदींनी सहभाग घेतला.
संवाद सभेच्या अखेरीस प्रगतिशील शेतकरी ज्ञानेश्वर बोडके यांची “एक एकर शेतीतून यशस्वी शेती” या विषयावरील चित्रफीत दाखविण्यात आली. मनरेगातून ‘ग्रामसमृद्धी व लखपती शेतकरी’ ही संकल्पना राबविण्याकरिता जिल्ह्यातील समाजमध्यमाद्वारे यशोगाथा, यशस्वी शेतीचे प्रयोग, पानी फाउंडेशनच्या जल संवर्धनाबाबत चित्रफीती आणि विविध शासन निर्णय व परिपत्रके पोहोचविण्यात येत आहेत.