नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अपूर्ण असलेली कामे संबंधित यंत्रणांनी त्वरीत पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस उपजिल्हाधिकारी शाहूराज मोरे, वनसंरक्षक सुरेश केवटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे आदी उपस्थित होते.
डॉ.भारूड म्हणाले, वन विभागाने अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यात मनरेगाच्या कामांना गती द्यावी. वनकृषीसाठी स्थानिक नागरिकांना मार्गदर्शन करावे. रोजगार आणि उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून दुर्गम भागात जंगल वाढविण्यावर भर द्यावा. नागरिकांचे स्थलांतर रोखण्यासाठी जंगल वाढविणे आणि उत्पन्न देणाऱ्या वृक्षांची लागवड करणे महत्वाचे आहे.
सामाजिक वनीकरण विभागाने नर्सरीची कामे त्वरीत पूर्ण करावी आणि नव्या कामांचे नियोजन करावे. यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य घेण्यात यावे. ऑक्टोबर महिन्यात फळबाग लागवड वगळता इतर सर्व अपूर्ण कामे पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी दिले. कृषी विभागाने फळबाग लागवडीची कामे तीन टप्प्यात नियोजन करून पूर्ण करावे असे त्यांनी सांगितले. कोरोनाच्या संकटाच्या काळात नागरिकांना रोजगार देऊन स्थलांतर रोखण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
जिल्ह्यात 2539 कामे सुरू असून 11 हजार मजूर कामांवर आहेत. नाशिक विभागात जिल्ह्याने चांगली कामगिरी केली असून केवळ पाच महिन्यात 51 कोटींची कामे केली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.