नंदुरबार : कोविड-19 च्या संकटात ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रशासनातर्फे विशेष मोहिम हाती घेण्यात आली असून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून 16 हजार 725 मजूरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. मनरेगा अंतर्गत शेल्फवर 32 हजार कामे ठेवण्यात आली असून 31 हजार अपूर्ण कामे उपलब्ध आहेत. जॉबकार्ड असलेल्या व्यक्तीने कामाची मागणी करताच त्याला रोजगार उपलब्ध करून देण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. एकूण 363 ग्रामपंचायतीमध्ये कामे सुरू करण्यात आली आहेत.
अक्कलकुवा तालुक्यात 3736, अक्राणी 3130, नंदुरबार 1977, नवापूर 3160, शहादा 2742 आणि तळोदा तालुक्यात 1980 मजूर कामावर आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून आणि मास्क घालून कामे करण्यात येत आहेत. पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी दुर्गम भागातील आदिवासी मजूरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामस्तरावर प्रयत्न करण्याचे निर्देश दिले आहेत. मजूर संख्येच्या बाबतीत जिल्हा राज्यात सहाव्या क्रमांकावर असून 40 हजार मजूरांना रेाजगार उपलब्ध करून देत जिल्ह्याला पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न सुरू आहेत.
मजूरांना एका दिवसासाठी 238 रुपये मजूरी देण्यात येत आहे. जिल्ह्यात मस्टर संपल्यानंतर आठ दिवसाच्या आत 100 टक्के मजूरांच्या खात्यावर मजूरीची रक्कम थेट जमा करण्यात येते. आतापर्यंत दीड कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांकडून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. योजनेविषयी आणि उपलब्ध कामाविषयी माहिती देण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर एका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कामांचे संनियंत्रण आणि येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहेत. कृषी विभागातर्फे 73, वन विभागातर्फे 93, सामाजिक वनीकरण विभागातर्फे 23 आणि ग्रामपंचायत स्तरावर 3424 कामे सुरू आहेत. जलसंधारण, जलसंपदा, वन, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फतदेखील कामे सुरू करण्यात येत आहेत.
योजनेअंतर्गत वैयक्तिक स्तरावर शोषखड्डे, सिंचन विहीर, शौचालय, गुरांचा गोठा, मजगी, ढाळीचे बांध, घरकूल, फळबागा आदी कामे घेता येतात. तर सार्वजनिक स्तरावर नाला बांध, सीसीटी, गाळ काढणे, रस्ते, रोपवन, रोपवाटीका, रस्ता दुतर्फा लागवड आदी कामे घेता येतात. प्रत्येक कामाचे जीपीएस मॅपिंग करण्यात येते. मनरेगाच्या माध्यमातून ग्रामीण विकासाची आणि वैयक्तिक लाभाची अनेक कामे हाती घेता येणे शक्य आहे. योजनेच्या माध्यमातून खात्रीचा रोजगार मिळत असून वेळेवर मजूरी मिळत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांनी काम मिळविण्यासाठी ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा. ग्रामपंचायतीनेदेखील नागरिकांना योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहीत करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.भारुड यांनी केले आहे.