नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणूक 2021 चा कार्यक्रम जाहीर झाला असून आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण मतदार संघाच्या क्षेत्रातील शस्त्र परवानाधारक (राष्ट्रीयकृत व इतर बँकांचे सुरक्षा कर्मचारी, पोलीस कर्मचारी वगळून) यांचेकडील शस्त्र बाळगण्यावर निर्बंध घालण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत.
विशिष्ठ परवानाधारकांचे बाबतीत त्यांची गरज तपासून ठराविक कालमर्यादेसाठी परावानाधारकांनी शस्त्र बाळगण्याची परवानगी मागितल्यास त्यांच्या अर्जावर वेगळ्याने बाब तपासून निर्णय घेण्यात येईल. निवडणूक प्रक्रीया संपल्यानंतर शस्त्र बाळगण्यावरील निर्बंध आपोआप रद्द होतील आणि जमा केलेली शस्त्रे परवानाधारकांना मतमोजणीच्या एका आठवड्यानंतर परत करण्यात यावीत. विनापरवाना अवैध शस्त्रांचा वापर होणार नाही याकरीता राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पोलीस विभागाने कारवाई करावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.