नंदुरबार : राज्यातील विविध भागातून किंवा परराज्यातून आलेल्या जिल्ह्यातील नागरिकांनी किंवा कामासाठी जिल्ह्यात आलेल्या नागरिकांनी शासकीय रुग्णालयात आरोग्य तपासणी करून घ्यावी,असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे.
कोविड-19 मुळे झालेल्या मृत्युच्या दोन्ही प्रकरणात रुग्णास आरोग्य तपासणी न करता आधी खाजगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले होते. आजाराची लक्षणे वाढल्यावर त्यांची स्वॅब चाचणी करण्यात आली होती. वेळेवर आजाराचे निदान न झाल्याने त्यांचा दुर्देवी मृत्यु झाला.
ज्या रुग्णांची वेळेवर तपासणी करण्यात आली असे 9 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे. इतर रुग्णांची प्रकृतीदेखील स्थिर आहे. त्यामुळे नागरिकांनी आजाराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये व ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे आढळताच जिल्हा शासकीय रुग्णालयात तपासणी करून घ्यावी.
जिल्ह्यातील खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनीदेखील कोविडची लक्षणे आढळलेल्या रुग्णांची माहिती त्वरीत शासकीय यंत्रणेस द्यावी. त्यासाठी जिल्हा रुग्णालयाच्या नियंत्रण कक्षास 02564-210135 या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा जवळच्या तहसील कार्यालयास माहिती द्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.