नंदुरबार – नवापूर तालुक्यात बर्ड फ्लूचा पा्रदुर्भाव लक्षात घेता पशुसंवर्धन विभागाने परिणामकारक व योग्यरितीने सर्वेक्षण करावे आणि पोल्ट्री फार्ममधील पक्ष्यांच्या संख्येची नोंद घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत.
वन विभागाच्या मदतीने स्थलांतरित पक्ष्यांच्या मार्गांची माहिती घेण्यात यावी आणि वन्यजीव अभयारण्य, राष्ट्रीय उद्याने, जलाशय, पाणथळ जागेत स्थलांतरित व जंगली पक्षी यांच्या वास्तव्याचा शोध घेण्यात यावा. वन विभागाच्या साह्याने स्थलांतरित व वन्य पक्ष्यांचे नमुने घ्यावे. पक्षी विक्रेता केंद्र ठिकाणे व तेथील पक्ष्यांची संख्येबाबत माहिती घेण्यात यावी. बर्ड फ्लू प्रभावित राज्यातील शेजारच्या सीमावर्ती भागांची माहिती घेण्यात यावी.
व्यावसायिक व परसातील पोल्ट्री फार्ममधील पक्ष्यांचे नमुने तातडीने घ्यावे. पक्ष्यांच्या अचानक होणाऱ्या मरतुकीमुळे बर्ड फ्लूचा संशय असल्यास तात्काळ अहवाल सादर करण्यात यावा. बाधित पक्ष्यांची शास्त्रीय पद्धतीने कत्तल करणे, पोल्ट्री फार्म व परिसरातील स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्यात यावे.
नियंत्रित व प्रतिबंधित क्षेत्रातील कत्तल केलेले पक्षी, नष्ट केलेले अंडी व पशुखाद्य याबाबत सर्व आकडेवारी याची नोंद ठेवावी. व्यवसायिक व परिसरातील पोल्ट्री फार्मधारक यांना जैव सुरक्षिततेचे उपाययोजनांबाबत योग्य सल्ला व मार्गदर्शन करावे.
वन विभागाने वन्य तसेच स्थलांतरित पक्ष्यांचे असामान्य मृत्यूबाबत जिल्हा प्रशासनास वेळोवेळी माहिती द्यावी. स्थानिक स्वराज्य संस्थांनी बर्ड फ्लूच्या प्रसार रोखण्यासाठी तालुकास्तरावर सर्व संबंधिताच्या बैठका घ्याव्यात. बर्ड फ्लू नियंत्रणासाठी आवश्यक साधन सामग्रीची व्यवस्था करावी. बाधित क्षेत्र साथरोगापासून मुक्त होईपर्यंत कोणताही नवीन जिवंत पक्षी बाधित क्षेत्रात येणार नाही याची खबरदारी घ्यावी. साथ रोगाबाबत जनजागृती करावी.
आरोग्य विभागाने कत्तल लसीकरण स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण व निगराणी आणि क्षेत्रात जलद कृती दलातील सदस्यांचे नियमित आरोग्य तपासणी करण्यासाठी वैद्यकीय जलद कृती दल तयार करावे. कत्तल ऑपरेशनमध्ये व्यस्त असणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी. विषाणू विरोधी औषधांचा वेळेवर व सातत्याने पुरवठा करावा.
जिल्हा परिषदेने बर्ड फ्लू बाबत घ्यावयाच्या दक्षतेबाबत मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी करावी व नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करावी. निगराणी क्षेत्राची आखणी करून त्यामधील येणाऱ्या क्षेत्रांची व गावांची माहिती घ्यावी. बाधित व निगराणी क्षेत्र तसेच खड्ड्यांची जागा दर्शविणारे तात्पुरते स्थायी स्वरूपाचे मोठे फलक तयार करून त्या क्षेत्राच्या ठिकाणी जनजागृतीसाठी दर्शनी भागात लावावे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने बर्ड फ्लू वर नियंत्रण व प्रतिबंधासाठी जेसीबी, जेटींग कम सक्शन मशीन, फॅागर मशीन, फवारणी मशीन इत्यादी विविध साहित्यांची उपलब्धता सुनिश्चित करावी. बाधित झालेल्या क्षेत्रांचे नकाशे तयार करणेकामी मदत करावी. पोलिसांनी शेजारील राज्य आणि ठिकाणे येथून बर्ड फ्लू झालेल्या पक्षांची अनधिकृत वाहतूक व त्यांच्या संबंधित उत्पादने नंदुरबार जिल्ह्यात येणार नाहीत याबाबत आवश्यक दक्षता घ्यावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.