नंदुरबार (जिमाका वृत्त) महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई उच्च न्यायालय विधी सेवा उपसमिती औरंगाबाद यांच्या निर्देशान्वये नंदुरबार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्फत फिरते विधी सेवा केंद्र व लोक अदालत वाहनाचा शुभारंभ प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष न्या. आर. एस. तिवारी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.
जिल्हा न्यायालयात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा न्यायाधीश 2, एम. आर. नातू, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डी.व्ही. हरणे, व्ही. एन. मोरे, सह दिवाणी न्यायाधिश (वरिष्ठ स्तर) श्रीमती वाय. के. राऊत, दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) ए. आर. कुळकर्णी, एस. बी. मोरे, श्रीमती पी. एम. काजळे, नंदुरबार, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. पी. बी. चौधरी, अॅड. कमलाकर साळवे, अॅड. एम. पी. चौधरी, अॅड. शेख लोक अभिरक्षक कार्यालयाचे अॅड. सिमा खत्री, अॅड. एच. यु. महाजन, अॅड. जी. आर. वसावे, अॅड. श्रीमती. शुभांगी चौधरी, विधिज्ञ व न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.
‘न्याय आपल्या दारी’ या संकल्पनेतून फिरत्या लोक अदालतीच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील निवडक गावातील न्यायालयात प्रलंबित असलेली दिवाणी व फौजदारी प्रकरणे व दाखलपूर्व प्रकरणे या लोक अदालतीत तडजोडीने निकाली काढण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर नागरिकांना लोक अदालत व विविध कायद्याची माहिती देऊन कायदेविषयक जनजागृती केली जाणार आहे.
कार्यक्रमानंतर नंदुरबार तालुक्यातील टोकरतलाव या गावी कायदेविषयक शिबीर व विधी सेवेचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डि. व्ही. हरणे, यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत माहिती दिली. लोकअभिरक्षक कार्यालयाचे मुख्य अभिरक्षक अॅड. श्रीमती सिमा खत्री, अॅड. श्रीमती शुभांगी आर. चौधरी यांनी विविध कायद्यांबाबत मार्गदर्शन केले. अॅड. एच. यु. महाजन यांनी जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त वाढत्या लोकसंख्येचे दुष्परिणाम व लोकसंख्या नियंत्रणाचे फायदे सांगितले. अॅड.जी.आर. वसावे, यांनी आदिवासी भाषेतून शिक्षणाचा अधिकार, मुलभुत अधिकार, मोफत विधी सहाय्य याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन टोकरतलावचे ग्रामसेवक गणेश मोरे यांनी केले.
या कार्यक्रमास टोकरतलावचे सरपंच जयमाला गावित, उपसरपंच दिपक गावित, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व सदस्य, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक संजय पाटील, पोलीस पाटील अमृत वसावे, जनसाहसचे प्रतिनिधी गौतम वाघ, विकास मोरे, नुतन देसले, अर्चना गावीत तसेच गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
असे होणार फिरत्या लोक अदालत व शिबिरांचे कार्यक्रम
नंदुरबार तालुक्यातील धानोरा (12 जुलै 2023 ) कायदेविषयक शिबीर व फिरते लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. तर नवापूर तालुका विधी सेवा समिती मार्फत 13 व 14 जुलै 2023 रोजी, अक्कलकुवा येथे 15 व 16 जुलै 2023 रोजी, तळोदा येथे 17 व 18 जुलै 2023 रोजी, धडगाव येथे 19 व 20 जुलै 2023 रोजी, तर शहादा येथे 21 व 22 जुलै 2023 रोजी, फिरते लोकअदालतीचे व विधी सेवेच्या कायदेविषयक शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे.