नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :- केंद्रीय युवक व क्रीडा मंत्रालयातर्फे आयोजित ‘फिट इंडिया फ्रीडम रन’ उपक्रमात जिल्ह्यातील नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे.
नियमित व्यायामाकरीता नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी ‘फिट इंडिया’ अंतर्गत 29 ऑगस्ट ते 2 ऑक्टोंबर या कालावधीत ‘फिट इंडिया फ्रीडम रन’ ही चळवळ राबविण्यात येणार आहे.
उपक्रमात सहभाग घेण्यासाठी नागरिक कुठेही, कधीही धावू शकतात, चालू शकतात. प्रत्येक व्यक्ती आपल्या आवडीचा मार्ग, अनुकूल वेळ निवडू शकणार आहे. आवश्यकतेनुसार काही मिनिटांनी विश्रांती घेवूनही धावणे, चालणे करु शकतात. स्वंचलित किंवा कोणत्याही ट्रॅकिंग ॲप किंवा जीपीएस घड्याळाचा वापर करुन धावण्याचा, चाललेल्या अंतराचा मागोवा घेता येईल. त्यानुसार जिल्ह्यातील नागरिक, खेळाडू, महिला, पुरुष यांनी सामाजिक अंतर राखण्याच्या निकषानुसार 29 ऑगस्ट ते 2 ऑक्टोंबर या कालावधीत जास्तीत जास्त प्रमाणात धावण्यात सहभागी होवून स्वत: धावल्याची माहिती, ईमेल, संपर्क क्रमांक, धावण्याची तारीख, अंतर, राज्य, जिल्हा, गटाची इत्यादी माहिती www.fitindia.gov.in या संकेतस्थळावर मोबाईलद्वारे किंवा ॲपद्वारे अपलोड करावी.