नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : केंद्र सरकार सहाय्यित ‘प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योग’ योजनेतंर्गत वैयक्तिक तसेच गटांनी अर्ज सादर करावे असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी निलेश भागेश्वर यांनी केले आहे.
केंद्र सरकार सहाय्यित प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योग योजना सन 2020-21 व 2024-25 या पाच वर्षांच्या कालावधीत ‘एक जिल्हा एक उत्पादन’ या आधारावर राबविण्याचे नियोजन केले आहे. नाशीवंत शेतीमाल जसे फळे व भाजीपाला, तृणधान्ये, कडधान्ये, तेलबिया, मत्स्योत्पादन, मसाला पिके, दुग्ध व पशू उत्पादन, किरकोळ वन उत्पादने आदीमध्ये सद्यस्थितीत कार्यरत किंवा नवीन सुक्ष्म अन्नप्रक्रियेमध्ये कार्यरत किंवा नव्याने लाभ घेऊ इच्छिणारे वैयक्तिक लाभार्थी, बेरोजगार युवक,महिला, शेतकरी गट, कंपनी, संस्था, स्वयंसहायत्ता गट, उत्पादक सहकारी संस्था या योजनेसाठी पात्र आहेत.
नंदुरबार जिल्ह्यासाठी एक जिल्हा उत्पादन या घटकांमध्ये ‘भगर’ या पिकाची निवड करण्यात आली आहे. सद्यस्थितीत कार्यरत एक जिल्हा एक उत्पादनांमध्ये कार्यरत सुक्ष्म अन्नप्रक्रिया प्रकल्पांचे विस्तारीकरण, आधुनिकीकरण, स्तरवृध्दी या लाभासाठी पात्र असतील. तसेच नवीन स्थापित होणारे सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग केवळ एक जिल्हा एक उत्पादन पिकांमध्ये असावेत.
वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योगांना बँक कर्जाशी निगडीत पात्र प्रकल्प किमतीच्या 35 टक्क्यांपर्यंत व जास्तीत जास्त रुपये 10 लाख या मर्यादिपर्यंत प्रति प्रकल्पासाठी अनुदान देय असणार आहे. इच्छुक व्यक्तीं व स्वयं सहाय्यता गट, शेतकरी उत्पादक कंपनी सहकारी संस्थांनी प्रकल्प उभारणी अर्थ सहाय्यासाठी व योजनेबाबतच्या मार्गदर्शक सूचना व ऑनलाईन अर्ज https://pmfme.mofpi.gov.in तसेच राज्य सरकारच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषि विभागाच्या कार्यालय तसचे जिल्हा संसधान व्यक्ती अर्थात डीआरपी यांच्याशी संपर्क साधवा. या योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. भागेश्वर यांनी केले आहे.