मा. राष्ट्रपती महोदयांनी दि. ०९/०९/२०२२ रोजी प्रधानमंत्री टी.बी. मुक्त भारत अभियान या महत्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ केला. शुभारंभासाठी संपूर्ण भारतातील 75 आरोग्यवर्धिनी केंद्रांची निवड करण्यात आलेली होती, त्यात नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील भादवड या आरोग्यवर्धिनी केंद्राची निवड करण्यात आलेली होती. मा. जिल्हाधिकारी – मनीषा खत्री, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद – श्री रघुनाथ गावडे, मा. जिल्हा आरोग्य अधिकारी- डॉ. गोविंद चौधरी, मा. जिल्हा शल्यचिकित्सक – डॉ चारुदत्त शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार डॉ. अभिजीत गोल्हार – जिल्हा क्षयरोग अधिकारी, डॉ. हर्षद लांडे – जागतिक आरोग्य संघटना सल्लागार, डॉ. मनीषा वळवी – तालुका वैद्यकीय अधिकारी नवापूर, डॉ. योगेश वळवी – वैद्यकीय अधिकारी पळसून, डॉ. सखाराम वळवी – वैद्यकीय अधिकारी पळसून, डॉ. तुषार वसावे – समुदाय आरोग्य अधिकारी यांनी भादवड येथे प्रधानमंत्री टी.बी. मुक्त भारत अभियानाच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाचे नियोजन केले.
यावेळी खांडबारा येथील याहा मोगी मेडिकलच्या संचालिका दिपाली गावित व अविनाश गावित यांनी निक्षय मित्र उपक्रमांतर्गत परिसरातील पाच क्षयरुग्णांना त्यांच्याकडून पोषण आहाराचे वाटप केले यामध्ये प्रत्येक क्षयरुग्णाला दरमहा ३ किलो तांदूळ, ३ किलो गहू, १ किलो शेंगदाणे, १ लिटर खाद्य तेल, १ किलो गुळ, अर्धा किलो तुवर डाळ, अर्धा किलो मुग डाळ, अर्धा किलो मसुर डाळ देण्यात येणार आहे.
संसर्गजन्य आजारामुळे होणा-या मृत्युमध्ये क्षयरोगाचा समावेश प्रमुख १० आजारांमध्ये आहे. त्यामुळे संपूर्ण जगामध्ये व भारतामध्ये क्षयरोग आजाराचे व क्षयरोगामुळे होणा-या मृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी कालबध्द कार्यक्रम तयार केला आहे. भारताने सन २०२५ पर्यंत क्षयरोगाचे दुरीकरण करण्याचे धोरण निश्चित केले आहे.
ज्या व्यक्तीचा आहार पोषक नाही अशा व्यक्तीमध्ये क्षयरोग होण्याचे प्रमाण अधिक असते तसेच ज्या व्यक्तींना क्षयरोग झाला आहे अशा व्यक्तींना उपचार कालावधीत पोषण आहार मिळाला नाही तर त्यांना उपचार मिळुनही उपचाराचे सकारात्मक परिणाम दिसुन येतातच असे नाही. यामुळे क्षयरुग्णांमध्ये पोषक आहार हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.
या सर्व बाबींचा विचार करता केंद्र शासनाने प्रधानमंत्री टी.बी. मुक्त भारत अभियान (PMTMBA) सुरु केला आहे. या मध्ये विविध देणगीदार (व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, सहकार सेवा, विविध संस्था, निवडुन आलेले लोकप्रतिनिधी इ.) ज्यांना निक्क्षय मित्र असे संबोधण्यात येते. त्यांच्या मार्फत क्षयरुग्णांना १ ते ३ वर्षासाठी कोरडा आहार पुरविण्यात येऊ शकतो.
जिल्हयातील ज्या क्षयरुग्णांनी आहारासाठी संमती दिली आहे त्यांना आहार पुरवठा करायचा आहे. संमती दिलेल्या क्षयरुग्णांची माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी यांच्याकडे उपलब्ध आहे. संमती दिलेल्या क्षयरुग्णांना निक्क्षय मित्राच्या सहाय्याने पोषण आहार पुरविणे शक्य होईल.
तरी मा. जिल्हाधिकारी मनीषा खत्री व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार श्री रघुनाथ गावडे यांनी आवाहन केले आहे की नंदुरबार जिल्ह्यातील इच्छुक देणगीदारांनी प्रधानमंत्री टी.बी. मुक्त भारत अभियाना अंतर्गत निक्षय मित्र योजनेत सहभागी व्हावे व गरजू क्षयरुग्णांना पोषण आहार पूरवावा.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरोग्यवर्धिनी केंद्र भादवड, प्राथमिक आरोग्य केंद्र पळसून व जिल्हा क्षयरोग केंद्र नंदुरबार च्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले तसेच NIC ऑफिस व BSNL ऑफिसच्या अधिकाऱ्यांनी सहाय्य केले.