नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी अलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला असून याठिकाणी प्रत्येकी 15 खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील 180 रुग्णांच्या उपचाराची सोय होणार आहे.
अलगीकरण कक्षात भोजन, पाणी आणि औषधोपचारांची सुविधा करण्यात आली आहे. प्राथमिक केंद्रातून संदर्भित रुग्णांवर किंवा त्याच गावातील बाधित व्यक्तींवर येथे उपचार करण्यात येणार आहे. त्यामुळे कोरोना बाधितांना शहराच्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता रहाणार नाही. रुग्णाची प्रकृती गंभीर असल्यास त्यास जिल्हा रुग्णालयात संदर्भित करण्यात येणार आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता प्रशासनातर्फे गावपातळीवर उपचारांची सुविधा निर्माण करण्याचे काम सुरू आहे. ग्रामीण रुग्णालयात सुविधा निर्माण झाल्याने कोरोना रुग्णांवर वेळीच उपचार करणे शक्य होईल, असे अति.जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.के.डी.सातपुते यांनी सांगितले.
जिल्हा शासकीय रुग्णालयात आणखी 100 ऑक्सिजन खाटा
प्रशासनातर्फे जिल्हा शासकीय रुग्णालयात ऑक्सिजनची सुविधा असणाऱ्या आणखी 100 खाटांचे केंद्र सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी ऑक्सिजन यंत्रणेचे काम अंतिम टप्प्यात आहे. खाटांची सोयदेखील करण्यात आली आहे. लवकरच या केंद्रातही रुग्णांवर उपचार सुरू करण्यात येतील. नाशिक विभागातील जिल्हा रुग्णालयात 350 ऑक्सिजन खाटांच्या सहाय्याने एकाचवेळी कोरोना बाधितांना उपचाराची सुविधा देणारा नंदुरबार हा एकमात्र जिल्हा आहे , अशी माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये यांनी दिली.