नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिन समारंभाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम 26 जानेवारी 2021 रोजी राज्यभर एकाचवेळी सकाळी 9-15 वाजता करण्यात येणार असल्याने या दिवशी सकाळी 8.30 ते 10.00 च्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये.
एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी 8.30 च्या पुर्वी किंवा 10 वाजेनंतर करावा. ध्वजारोहण कार्यक्रमापुर्वी भारताच्या संविधानामधील उद्देशिका (सरनामा) चे सामुहिक वाचन करण्यात यावे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे तथा सूचनांचे अनुपालन करण्यात यावे. प्रजासत्ताक दिनाचा संपूर्ण कार्यक्रम सामाजिक अंतर संदर्भातील सर्व नियम पाळून संपन्न होईल याची संपूर्ण जबाबदारी आयोजकांची असेल. समारंभास उपस्थित राहणाऱ्या सर्व व्यक्तींनी राष्ट्रीय पोषाख परिधान करावा, असे उपजिल्हाधिकारी बबन काकडे यांनी कळविले आहे.