नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : पोषण अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागातर्फे आयोजित पोषण माहचे उद्धाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲड.सीमा वळवी यांच्या हस्ते जिल्हा परिषदेत करण्यात आले.
यावेळी उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशी, महिला व बालकल्याण सभापती निर्मलाताई राऊत, उप मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, जिल्हा आरोग्य अधिकारी नितीन बोडके, जिल्हा कार्यक्रम अधिकारी कृष्णा राठोड, जिल्हा परिषदेतील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
देशभरात 7 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत पोषण माह अभियान साजरा करण्यात येत आहे. पोषण माह अभियानांतर्गत कुपोषणाचे योग्य व्यवस्थापन व परसबाग फुलविने, त्याचबरोबर सर्व क्षेत्रातील गरोदर व स्तनदा माता व कुपोषित बालके यांच्या गृहभेटी देणे, 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांचे वजनमापन करणे, प्रसूतीपुर्व काळजी, स्तनपान, पुरक आहार, रक्तक्षय, वैयक्तिक स्वच्छता, मुलींसाठी शिक्षण व आहार तसेच पोषण आहारासंदर्भात जनतेत जनजागृती आदी उपक्रम घेण्यात येत आहेत.