नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात डोंगराळ भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीची आवश्यक कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत असे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी दिले.
शासकीय विश्रामगृह येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. ॲड.पाडवी म्हणाले, रोषमाळ आणि सुरवाणी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात यावे. मंजूर असलेल्या रस्त्याच्या कामांना गती देण्यात यावी. आदिवासी विकास विभागांतर्गत घेण्यात आलेल्या रस्त्यांची कामेदेखील तातडीने सुरू करण्यात यावी. रस्त्याच्या कामाची गुणवत्ता चांगली रहावी यासाठी अधिकाऱ्यांनी कामांना भेटी द्याव्यात.
धडगाव आणि अक्कलकुवा येथील विश्रामगृहाचे नुतनीकरण करण्यात यावे. आदिवासी आश्रमशाळेच्या प्रलंबित कामांना गती देण्यात यावी. वन विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून अक्कलकुवा तालुक्यातील आश्रमशाळेची जागा निश्चित करण्यात यावी. वन विभागाची कार्यालये एकाच ठिकाणी येण्यासाठी प्रस्ताव तयार करावा. सामाजिक वनीकरण विभागाने प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड करावी, असे त्यांनी सांगितले.
बैठकीला सार्वजनिक बांधकाम, जि.प.बांधकाम विभाग, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, जलसंपदा, वन विभाग, सामाजिक वनीकरण आदिवासी विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.