नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  कोरोना संसर्ग कमी होत असताना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना द्यावी,  असे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस खासदार डॉ.हिना गावीत, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, राजेश पाडवी, शिरीष नाईक, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत आदी उपस्थित होते.

ॲड.पाडवी म्हणाले, बाहेरील राज्यातून परतलेल्या जिल्ह्यातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावे. गाळ काढण्याची कामे, फळबाग, वृक्षारोपण अशी कामे घेण्यात यावी.  शेतीची कामे सुरू होईपर्यंत ग्रामीण भागात अधिक कामे सुरू करून रोजगार निर्माण करण्याचे प्रयत्न करावे.

वादळामुळे धडगाव आणि अक्कलकुवा भागात झालेल्या आंब्याच्या नुकसानीचा आढावा घ्यावा. खरीप हंगामात शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी बी-बियाणांची अवैध विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. खतांची वेळेवर उपलब्धता होईल याची दक्षता घ्यावी. पीक कर्ज वाटपाच्या कामाला गती देण्यात यावी.

अक्कलकुवा तालुक्यात ठिबक सिंचन अनुदानाबाबत असलेल्या तक्रारीविषयी बँक आणि कृषि विभागाने चौकशी करावी. घरकुल योजनेबाबत तक्रारींची चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी. शबरी घरकुल योजनेअंतर्गत जिल्ह्यासाठी उद्दिष्ट वाढवून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी तळोदा तालुक्याच्या पश्चिम भागासाठी विजेची व्यवस्था आणि एकलव्य रेसिडेन्सी शाळेसाठी जागेबाबत चर्चा करण्यात आली.

बैठकीस विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.