नंदुरबार – राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांच्या उपस्थितीत जिल्हा शासकीय रुग्णालय येथे कोरोना लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रघुनाथ भोये आणि आरोग्य कर्मचारी निलीमा वळवी यांनी पहिली लस घेतली.
यावेळी जि.प.अध्यक्षा सीमा वळवी, माजी महासंचालक तथा राज्य शासनाचे सल्लागार डॉ.सुभाष साळुंखे, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा शल्य जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.के.डी.सातपुते आदी उपस्थित होते.
यावेळी बोलता पालकमंत्री पाडवी म्हणाले, देशाच्यादृष्टीने हा ऐतिहासिक क्षण आहे. कोरोना संकट काळात ज्यांनी धैर्याने कर्तव्य बजावले अशा आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रथम कोरोना लस देण्यात येत आहे. लसीकरणाच्या सहाय्याने अनेक आजारांवर देशाने नियंत्रण मिळविले आहे. जिल्ह्यात अद्यापही कोरोनाचे संकट असताना कोरोनाला कायमचे हद्दपार करण्यासाठी लसीकरण उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यानंतर कोरोना काळात अधिक जोखीम असलेल्या कोरोना योद्ध्यांचे लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू होत असल्याने आरोग्य सुविधा अधिक सक्षम होतील असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील रिक्त पदे भरण्याबाबत लवकरच वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.