नंदुरबार (प्रतिनिधी):- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत राज्यातील 34 जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या (डायट) सुमारे 850 अधिकारी व कर्मचारी गेल्या 5 महिन्यांपासून वेतन रखडल्याने आर्थिक संकटात सापडले आहेत. नियमित वेतनासाठी राज्यव्यापी आंदोलन करण्याबाबत शासनास यापूर्वीच इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार दि. 24/09/2020 पासून राज्यातील डायटमधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी काळ्या फिती लावून कामकाजास निषेधात्मक सुरुवात केली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्हा स्तरावर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था कार्यरत असून, नंदुरबार येथे ही शासकीय संस्था सन 2011 पासून कार्यरत आहे. या संस्थे अंतर्गत प्राचार्य, वरिष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता, अधीक्षक हे वर्ग 1 व वर्ग 2 चे अधिकारी व कार्यालयीन कर्मचारी कार्यरत आहे.
कोरोना काळात डायटचे अनेक अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात अत्यावश्यक सेवेमध्ये नोडल ऑफिसर म्हणून कार्य करत आहेत. शिवाय “शाळा बंद व शिक्षण सुरू” त्याचबरोबर इतर अनेक गुणवत्तापूर्ण उपक्रमांमध्ये ऑनलाइन शिक्षणात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. असे असताना एकीकडे आपण शासनाचे अधिकारी असतानाही आणि कोविड काळात अशी भूमिका बजावत असतानाही पगार होत नाही, या विवंचनेत सर्व अधिकारी व कर्मचारी सापडले आहेत.
नंदुरबार डायट चे प्राचार्य श्री. जालिंदर सावंत यांच्या नेतृत्वाखाली सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी काळ्या फिती लावून लाक्षणिक निषेध नोंदविला असून, याबाबत आयुक्त (शिक्षण) व संचालक, म.रा.शै. सं. व प्र. परिषद, पुणे यांच्यामार्फत शासनास निषेध कळविला आहे.
थकीत वेतन लवकर न झाल्यास काम बंद आंदोलन व उपोषण करण्याबाबतचा इशारा राज्य संघटनेमार्फत शासनाला देण्यात आला आहे.
नंदुरबार येथे झालेल्या या आंदोलनात वरिष्ठ अधिव्याख्याता सर्वश्री अनिल झोपे, शिवाजी औटी, रमेश चौधरी, अधिव्याख्याता संदीप मूळे, पंढरीनाथ जाधव यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला.