नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : मा. भारत निवडणूक आयोगाने नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याचे निर्देश दिले आहे. मतदार नोंदणीसाठी 1 नोव्हेंबर 2022 रोजीच्या अर्हता दिनांकावर आधारित मतदार नोंदणीचा पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.त्यानुसार एक ऑक्टोंबर 2022 पासून मतदार नोंदणीला सुरवात होईल. नंदुरबार जिल्ह्यातील जास्तीत जास्त पदवीधरांनी नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.
मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम असा : शनिवार 1 ऑक्टोबर 2022 रोजी जाहीर सूचना प्रसिद्ध केली जाईल. शनिवार 15 ऑक्टोंबर 2022 रोजी मतदार नोंदणी अधिनियमान्वये वृत्तपत्रात नोटिसीची प्रथम पुनर्प्रसिद्धी करण्यात येईल. मंगळवार 25 ऑक्टोबर 2022 रोजी द्वितीय नोटीस पुनर्प्रसिद्धी करण्यात येईल. नमुना 18 किंवा 19 द्वारे दावे व हरकती स्वीकारण्यांचा अंतिम दिनांक सोमवार 7 नोव्हेंबर 2022 असेल. शनिवार 19 नोव्हेंबर 2022 रोजी हस्तलिखिते तयार करणे व प्रारुप मतदार याद्याची छपाई करण्यात येईल. बुधवार 23 नोव्हेंबर 2022 रोजी प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी करण्यात येईल.
बुधवार 23 नोव्हेंबर 2022 ते 9 डिसेंबर 2022 या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येईल. रविवार 25 डिसेंबर 2022 रोजी दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक व पुरवणी यादी तयार करणे व छपाई करण्यात येईल. शुक्रवार 30 डिसेंबर 2022 रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी करण्यात येईल.
पदवीधर मतदार संघाच्या यादीत नाव नोंदविण्यासाठी अर्ज नमूना क्रमांक 18 अर्जदाराने भरुन द्यावयाचा आहे. मतदार नोंदणीसाठी अर्हता दिनांक 1 नोव्हेंबर 2022 असा आहे. म्हणजेच ज्या नागरिकांनी एक नोव्हेंबर 2022 पूर्वी किमान तीन वर्ष आधी कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त केलेले नागरिक मतदार नोंदणीसाठी पात्र आहेत. अर्जासोबत पदवी प्रमाणपत्राची किंवा मार्केशिटची साक्षांकित छायांकित प्रत जोडणे आवश्यक असेल.
नमूना क्रमांक 18 मध्ये आधार क्रमांकासाठी रकाना उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. तथापि, आधार क्रमांक सादर करणे हे मतदारांच्यावतीने ऐच्छिक आहे, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. आधार क्रमांक सार्वजनिक होणार नाही याची खबरदारी घेण्यात येणार आहे. पदवीधर मतदारसंघाच्या यादीत नाव नोंदिवण्यासाठीचे अर्ज हे सर्व तहसिल कार्यालयातील निवडणूक शाखेत उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तसेच अर्ज https://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त पदवीधरांनी नाव नोंदणी करावी, असे आवाहन श्रीमती खत्री यांनी केले आहे.