नंदुरबार (जिमाका वृत्त) –केंद्रवर्ती अर्थसंकल्प अर्थात न्युक्लिअस बजेट योजनेत आदिवासी कल्याण व मानव साधन-संपत्ती विकासाच्या व कल्याणात्मक योजनेअंतर्गत भांडीसंच, भजनी साहित्य व बचत गटासारख्या उपक्रमांना अर्थसहाय्य देण्यात येणार असून, तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रातील तळोदा, अक्कलकुवा व धडगांव तालुक्यातील आदिवासी लाभार्थ्यांनी त्यासाठी 5 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन तळोदा प्रकल्प अधिकारी मंदार पत्की यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
वर्ष 2023-2024 या आर्थिक वर्षात केंद्रवर्ती अर्थसंकल्प (न्युक्लिअस बजेट) योजनेत आदिवासींचे कल्याण व साधन-संपत्ती विकासाच्या हेतुने अनुसूचित जमातीच्या ग्रामपंचायती व बचतगटांना सार्वजनिक कार्यक्रमासाठी भांडीसंच, ग्रामपंचायत व भजनी मंडळ यांना भजनी साहित्य, तसेच अनुसूचित जमातीच्या बचतगटांचे सक्षमीकरणासाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुक आदिवासी लाभार्थ्यांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विहित नमुन्यातील अर्ज, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा येथे 5 जानेवारी 2024 पर्यंत वितरीत व स्वीकारले जाणार असल्याचेही प्रकल्प अधिकारी श्री. पत्की यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.