नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणूक 2021 साठी राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सुचना आणि कोरोनाविषयक मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पोटनिवडणुकीबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी बालाजी क्षिरसागर, बबन काकडे, उपविभागीय अधिकारी शाहूराज मोरे, चेतन गिरासे महेश सुधाळकर आदी उपस्थित होते.
डॉ.भारुड म्हणाले, मंगल कार्यालय आणि सभागृह मालकांच्या बैठका घेण्यात याव्यात. कोणत्याही राजकीय बैठकीत किंवा सभेत 50 पेक्षा अधिक व्यक्ती असणार नाहीत याची दक्षता घ्यावी. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांना याबाबत माहिती देण्यात यावी. मतदान आणि मतमोजणीच्यावेळीदेखील गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्यावी.
प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांचे तापमान मोजण्याची आणि सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात यावी. कोरोनाच्या अनुषंगाने आवश्यक व्यवस्था करण्यासाठी समन्वयक आरोग्य अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी. निवडणूक क्षेत्रातील अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण करण्याचा प्रयत्न करावा. मतदान व मतमोजणीसाठी नियुक्त प्रत्येक कर्मचाऱ्याने किमान लसीचा एक डोस घेतला असेल याची खात्री करावी.
संपूर्ण निवडणुकीदरम्यान निवडणूक आचारसंहितेचे कटाक्षाने पालन होईल याकडे लक्ष द्यावे. मतदान केंद्राची पाहणी करून पावसाच्या अनुषंगाने आवश्यक व्यवस्था करण्यात यावी. मतदान कर्मचाऱ्यांचे आवश्यक प्रशिक्षण घेण्यात यावे. मतदान केंद्रावरील आवश्यक सुविधांचा आढावा घेण्यात यावा व आवश्यक दुरुस्ती करण्यात यावी. महिला मतदान केंद्र आणि आदर्श मतदान केंद्र निश्चित करावे व मतदार सहाय्य केंद्र स्थापित करावे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी पेड न्यूज समिती, संनियंत्रण समिती, शस्त्र जमा करणे आदी विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. निवडणूक विषयी विविध परवानग्या देण्यासाठी एक खिडकी योजना राबवावी व आचारसंहिता कक्षाची स्थापना करावी, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
जिल्ह्यातील 11 निवडणूक विभाग आणि 14 निर्वाचक गणासाठी पोटनिवडणूक होणार आहे. त्यापैकी अक्कलकुवा तालुक्यात 2 निवडणूक विभाग आणि 1 निर्वाचक गण, शहादा 4 विभाग आणि 8 गण तर नंदुरबार तालुक्यात प्रत्येकी 5 निवडणूक विभाग व निर्वाचक गण आहेत. अक्कलकुवा तालुक्यातील 34, शहादा 186 आणि नंदुरबार तालुक्यातील 236 अशा एकूण 456 मतदान केंद्रांवर 2 लाख 82 हजार 387 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यापैकी 1 लाख 39 हजार 548 स्त्री आणि 1 लाख 42 हजार 839 पुरुष मतदार आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली. बैठकीस तिन्ही तालुक्यांचे तहसिलदार, गट विकास अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.