नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : राज्यात स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासन व प्रादेशिक पर्यटन संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक विभागात 6 ते 28 मार्च 2021 या कालावधीत पर्यटन महोत्सवांचे आयोजन करण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी तथा पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक नितिनकुमार मुंडावरे यांनी दिली आहे.
पर्यटन संचालनालयातर्फे 6 ते 7 मार्च रोजी अहमदनगर येथील भंडारदरा ता. अकोले , 14 मार्च रोजी धुळे येथील लळिंग किल्ला महोत्सव तर 25 ते 26 मार्च 2021 रोजी नाशिक जिल्ह्यातील नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य येथे पक्षी महोत्सव व 27 ते 28 मार्च 2021 रोजी ग्रेप पार्क रिसॉर्ट नाशिक येथे ग्रेप हार्वेस्टींग महोत्सव आयोजित करण्यात आले आहे.
या महोत्सवांमध्ये स्थानिक शेतकरी व आदिवासी बांधवांनी उत्पादित केलेल्या वस्तुंचे प्रदर्शन व विक्री, ट्रेकिंग, विविध विषयावरील मार्गदर्शनपर व्याख्याने, छायाचित्र व चित्रकला स्पर्धा, किल्ले बनविण्याची स्पर्धा, ऐतिहासिक पोवाडा, पर्यटन स्थळांना भेट, शेती व शेती उत्पादनापासून विविध पदार्थ बनविणे, स्थानिक कलासंस्कृती, खाद्यपदार्थ व हस्तकला यांचे प्रदर्शन व विक्री, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी विविध कार्यक्रमांची मेजवानी पर्यटकांना अनुभवता येणार आहे.
अधिक माहितीसाठी पर्यटन संचालनालय, उपसंचालक कार्यालय, पर्यटन भवन, शासकीय विश्रामगृह आवार, गोल्फ क्लब मैदान नाशिक दूरध्वनी क्रमांक 0253-2570059/2579352 किंवा www.maharashtratourism.gov.in किंवा [email protected] वर संपर्क साधावा. तसेच जास्तीत जास्त पर्यटकांनी या महोत्सवाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन पर्यटन संचालनामार्फत करण्यात आले आहे.