नंदुरबार (प्रतिनिधी) स्टार प्रकल्पांतर्गत शालेय शिक्षण विभागाच्या नियतकालिक मूल्यमापन चाचण्यांना (PAT) आज जिल्हाभरात सुरुवात झाली. जिल्हाभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व खाजगी अनुदानीत शाळांतील इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी या संकलित मूल्यमापन चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या नियोजनानुसार राज्यातील इयत्ता तिसरी ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी संकलित मूल्यमापन चाचणी क्र. 1 चे आयोजन करण्यात आले आहे. दि. 30 ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर 2023 या तीन दिवसात राज्यभरातील शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांसाठी या चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. नंदुरबार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था तसेच जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये सुरू असलेल्या या मूल्यमापन चाचण्यांसाठी पर्यवेक्षकिय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी श्रीमती मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सावन कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. जगराम भटकर, जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण अधिकारी श्री प्रवीण अहिरे, प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री सतीश चौधरी, उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण, श्री भावेश सोनवणे यांच्या नेतृत्वात या चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. या चाचणीसाठी राज्यस्तरावरून प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात आल्या असून, संपूर्ण राज्यातील सर्व शाळांमध्ये समान पद्धतीने मूल्यमापन व्हावे, या उद्देशाने या चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी अशा चाचण्या शाळा स्तरावर घेण्यात आलेल्या आहेत. मात्र राज्यस्तरावरून अशा चाचणीचे आयोजन करण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे योग्यरित्या मूल्यमापन होईल, असा विश्वास संबंधित अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे वरिष्ठ अधिव्याख्याता श्री. प्रवीण चव्हाण, अधिव्याख्याता डॉ. राजेंद्र महाजन, डॉ. वनमाला पवार, डॉ. बाबासाहेब बडे, श्री. प्रदीप पाटील, विभाग प्रमुख श्री विनोद लवांडे, श्री. सुभाष वसावे, विषय सहायक श्री देवेंद्र बोरसे यांच्यासह तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख यांनी शाळाभेटी करून पडताळणी करत असून, क्षेत्रिय अधिकारी व कर्मचारी या परीक्षेसाठी मार्गदर्शन व मदत करत आहेत.