नंदुरबार (जिमाका वृत्त) : जेवढा दुर्गम भाग असेल तेवढ्या आरोग्याच्या समस्या जटील असतात; अशा परिस्थितीत वैद्यकीय शिक्षण घेताना जे ज्ञान विद्यर्थ्यांना मिळेल ते जगाच्या पाठीवर कुठेही मिळू शकत नाही त्यामुळे नंदुरबार सारख्या दुर्गम जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाच्या अमर्याद संधी आहेत. तसेच जिल्ह्याच्या रौप्य महोत्सवी वर्षात विविध विभागांच्या निर्माण होणाऱ्या स्वतंत्र इमारतींमुळे प्रशासकीय कामगाज गतीमान व अधिक सुविधांनीयुक्त होईल, असा विश्वास आज राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी व्य्यक्त केला आहे.
ते आज नंदुरबार शहरात माता व बाल संगोपन रूग्णालय, अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र समिती, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतींच्या पायाभरणी समारंभ प्रसंगी बोलत होते. यावळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, आमदार आमश्या पाडवी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक जिल्हा परिषदेच्या सभापती हेमलता शितोळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्याकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारूदत्त शिंदे, वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकरे जिल्हा आरोग्य डॉ. गोविंद चौधरी तसेच जात पडताळणी समितीचे सहआयुक्त गिरीष सरोदे, अन्न व औषध प्रशासनाचे सह-आयुक्त विभागीय गणेश परळीकर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता वैशाली पाटील, तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी, विवध यंत्रणांचे अधिकारी व नागरिक याप्रसंगी उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. विजयकुमार गावित म्हणाले, या जिल्ह्याची निर्मिती अत्यंत आग्रहपूर्वक व दूरदृष्टिकोनातून केली करण्यात आली आहे. पालकमंत्री या नात्याने विवध उपक्रम, योजना, संसाधनांची निर्मिती करून जिल्ह्याच्या पालन-पोषणाच्या जबाबदारीचे निर्वहन अत्यंत सुक्ष्म नियोजन व दृष्टिकोनातून केले जाईल, असाही विश्वास त्यांना यावेळी उपस्थितांना दिला. तसेच पुढे ते म्हणाले, गुजरात, मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या या भागाचा विकास केवळ स्वतंत्र जिल्हा निर्मितीमुळे आपण करू शकलो. नंदुरबार जिल्ह्यासोबत व त्यानंतरही ज्या जिल्ह्यांची निर्मिती झाली त्या जिल्ह्यांच्या तुलनेत नंदुरबार चा विकास अत्यंत वेगाने व शाश्वत स्वरूपात आपण करतो आहोत. लवकरच वैद्यकीय महाविद्यालयातून पदवी घेतलेली पहिली बॅच बाहेर येणार असून या महाविद्यालयातून शिक्षण घेवून बाहेर पडणारे विद्यार्थी नक्कीच स्वत:ला भाग्यशाली समजतील एवढ्या क्लिष्ट स्वरूपाची रुग्णसेवा त्यांच्या हातून शिक्षण घेतानाच होते आहे. त्यामुळे जगातील कुठल्याही आरोग्य समस्येला सहज उपाय करणारे विद्यार्थी येथे घडलेले आपल्याला दिसतील. लवकरच वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतींचा पायाभरणी समारंभ होणार असून 41 एकर च्या परिसरात सुसज्ज, सर्व सुविधांनीयुक्त असे वैद्यकीय शिक्षण संकुल आपल्याला पहावयास मिळणार आहे. त्याचबरोबर लवकरच येथे वैद्यकीय शिक्षणाचे पदव्युत्तर अभ्यासक्रमही सुरू करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री डॉ. गावित यांनी देवून विविध इमारतींच्या पायाभरणीस शुभेच्छाही त्यांनी यावेळी दिल्या आहेत.
जिल्ह्यातील प्रत्येक बालकाचे पोषण करणार
डॉ. सुप्रिया गावित
जिल्ह्यातील कुठलेही बालक पोषणापासून वंचित राहणार नाही याची काळजी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून घेतली जात आहे. कामाच्या निमित्ताने परराज्यात स्थालांतरित होणाऱ्या मजूराच्या मुलांना ट्रॅक करून ते ज्या राज्यातील गावात स्थलांतरित होत आहेत तेथे अंगणवाडी व प्रशासनाच्या समन्वयातून पोषण आहार दिला जात आहे. जिल्ह्यातील प्रत्येक बालकाचे पोषण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वचनबद्ध असल्याचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांनी सांगितले.
कुपोषणमुक्त जिल्हा म्हणून ओळख निर्माण करणार
डॉ. हिना गावित
कुपोषण आणि बालमृत्युचा शिक्का आपल्या जिल्ह्याला बसला असून हा शिक्का पुसून काढण्याची पायाभरणी म्हणजे हे माता व बाल संगोपन रूग्णालय असून जिल्ह्यातील प्रत्येक माता व जन्माला येणारे बालक हे सुदृढ व निरोगी राहील यासाठी देशातील उपलब्ध सर्वोच्च साधन-सामुग्री व सुविधा या रूग्णालयात केल्या जाणार आहेत. केंद्र सरकारच्या माध्यमातून या रूग्णालयाची निर्मिती केली जात असून त्यासाठी कुठल्याही प्रकारची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे आश्वासन यावेळी खासदार डॉ. हिना गावित यांनी दिले.