नंदुरबार (प्रतिनिधी) :- जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर येथील जिल्हा परिषदेमध्ये येणाऱ्या नागरिकांची व जिल्हा परिषद इमारतीमध्ये असलेल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली असून, जिल्हा परिषद इमारत लॉकडाऊन करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विनय गौडा यांनी याबाबत निर्णय घेऊन कार्यवाही सुरू केली आहे.
जिल्हा परिषद म्हणजे मिनी मंत्रालय म्हणून जिल्ह्याच्या ठिकाणी अस्तित्वात असते. याठिकाणी जिल्हाभरातून नागरिक आपली विविध कामे घेऊन नियमित येत असतात. त्यामुळे जिल्हा परिषद इमारतीत मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. सध्या जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना या विषाणूचा संसर्ग रोखणे महत्त्वाचे मानले जात असून, त्या अनुषंगाने जिल्हा परिषद प्रशासनाने पावले उचलली आहेत. त्याअनुषंगाने नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विनय गौडा यांनी जिल्हा परिषद इमारत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला असून, त्यानुसार कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी जिल्हा परिषदेमध्ये अपरिहार्य कारणाशिवाय प्रवेश करु नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारावर अभ्यागतांना महत्त्वाच्या कारणाची नोंदणी केल्यानंतरच इमारतीमध्ये प्रवेश दिला जात आहे. इमारतीमध्ये पोहोचेपर्यंत दोन ठिकाणी प्रत्येकाची चौकशी केली जात असून, महत्त्वाच्या कामाव्यतिरिक्त कुणालाही प्रवेश दिला जात नाही. नागरिकांना जिल्हा परिषद प्रशासनाकडे अत्यंत महत्वाचे काम असल्यास वा काही निवेदन द्यायचे असल्यास ईमेल द्वारे [email protected] या ईमेल आयडीवर किंवा 02564- 210224, 210241 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी प्रत्यक्ष म्हणणे मांडणे आवश्यक असेल तरच सकाळी 11 ते 1 वाजेदरम्यान कार्यालयात यावे, आशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे कार्यालयीन कर्मचाऱ्यांची संख्या 25 टक्क्यांवर आणण्यासाठी सर्व विभाग प्रमुखांना सूचना देण्यात आल्या आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने हे पाऊल उचलले असून, दिनांक 31 मार्चपर्यंत शासनाच्या सूचनांच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीने कार्यवाही सुरू राहणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विनय गौडा यांनी सांगितले. नागरिकांनी अपरिहार्य कारणाशिवाय घरातून बाहेर पडू नये, स्वच्छता राखावी, सॅनिटायझरचा वापर करावा, खोकला व घसादुखी असल्यास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा सरकारी रुग्णालयात तपासणी करून घ्यावी, गर्दी करणे टाळावे, हात धुण्याच्या शास्त्रीय पद्धतीने नियमित हात स्वच्छ करावेत, आपले हात चेहऱ्याला; नाकाला; डोळ्यांना लावू नयेत, अश्या पध्दतीने काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.