नंदुरबार – कोरोना चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेल्या 21 संशयित व्यक्तीचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. यापैकी 4 व्यक्ती कोरोनाग्रस्त रुग्णाच्या कुटुंबातील आहेत, या सर्व व्यक्तींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिल्याचे वृत्त संस्थांनी प्रसिद्धीस दिले आहे.
नंदुरबार येथून एकूण 35 संशयित व्यतींच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. त्यापैकी 21 निगेटीव्ह आले आहेत. निगेटीव्ह रुग्णापैकी जिल्ह्यातील वडफळी आणि अंबाबारी येथील 7 व्यक्ती असून, नंदुरबार शहरातील अलीसाहाब मोहल्ला भागातील इतर दोन व कोरोना बाधिताने तपासणी केलेल्या खाजगी रुग्णालयातील तीन व्यक्तींचा यात समावेश आहे. 14 संशयित व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत.
संशयित रुग्णांना क्वॉरंटाईन करण्यात आले असून, त्यांची नियमित वैद्यकीय तपासणी होत आहे. कोरोनाग्रस्त रुग्णावर निर्धारीध पद्धतीनुसार उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे. प्रशासनातर्फे शहरातील प्रभाग क्र.10 सील करण्यात आला असून, या भागात दिवसातून पाचवेळा फवारणी करण्यात आली आहे.
कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी प्रशासनातर्फे आवश्यक खबरदारी घेण्यात येत असून, शहरातील सर्व व्यवहार तीन दिवसासाठी बंद ठेवण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा नेहमीप्रमाणे सुरू आहेत. मात्र भाजीपाला, फळे विक्रीवर 20 तारखेपर्यंत बंदी राहणार आहे. 20 एप्रिलनंतर काही निर्बंध शिथिल होणार असले तरी कंटेंटमेंट झोनमधील कोणत्याही व्यक्तीला बाहेर जाण्याची अनुमती असणार नाही, असे जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले असल्याचे वृत्त संस्थांनी म्हटले आहे