नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण ) नियम 2000 नुसार श्रोतगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष या सारख्या बंद जागा खेरीज इतर ठिकाणी ध्वनीक्षेपक व ध्वनिवर्धकाचा वापर करण्यासाठी जिल्ह्याच्या निकडीनुसार 15 दिवस सकाळी 6 वाजेपासून रात्री 12 वाजेपर्यंत सूट देण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी आदेशित केले आहे.
जिल्ह्यात 2021 यावर्षात 19 फेब्रुवारी शिवजयंती, 14 एप्रिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, 1 मे महाराष्ट्र दिन, 10, 14 आणि 19 सप्टेंबर असे गणेशोत्सावाचे तीन दिवस, 13 व 14 ऑक्टोबर नवरात्र उत्सव, 19 ऑक्टोंबर ईद-ए-मिलाद, 4 नोव्हेंबर दिवाळी, 25 डिसेंबर ख्रिसमस, 31 डिसेंबर आणि उर्वरीत 3 दिवस राज्य शासनाच्या महत्वाच्या कार्यक्रमासाठी राखीव असतील.
सर्वोच्च न्यायालयाचे आदेशानुसार ध्वनिक्षेपकाचा आवाज ध्वनी प्रदूषण (नियम व नियंत्रण ) नियम 2000 मधील विहित मर्यादेच्या आत ठेवावा. ध्वनीक्षेपण रात्री 10 ते 12 वाजेपर्यंत करता येईल. कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता आयोजकांनी घ्यावी. ध्वनीक्षेपकाचा वापर करताना आक्षेपार्ह ध्वनीक्षेपण करु नये, तसेच कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. ध्वनीक्षेपकाची ध्वनीमर्यादा ही 45 डेसीबल पेक्षा जास्त असणार नाही याची दक्षता घ्यावी. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) मधील तरतुदीचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी.
ध्वनीक्षेपनाबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास ध्वनीक्षेपण परवानगी कोणतीही पुर्वसूचना न देता रद्द करणेत येईल. ध्वनीक्षेपण परवानगीत बदल करण्याचा अगर परवानगीत रद्द करण्याचा अधिकार जिल्हादंडाधिकारी नंदुरबार यांनी राखून ठेवले आहे. तसेच कोविड-19 विषाणुंचा प्रसार व प्रादुर्भाव होऊ नये याकरिता जिल्हा प्राधिकरणाने उपाययोजनेचा एक भाग म्हणून पारीत केलेल्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक राहील असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.