नंदुरबार दि.2- कोविड-19 चाचणीसाठी पाठविलेले 48 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 594 पैकी 510 अहवाल निगेटिव्ह आले असून 18 व्यक्तींना या आजाराचा संसर्ग झालेला आहे. 65 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत.

दरम्यान नंदुरबार शहरातील प्रतिबंधित क्षेत्रातील काही निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. नगरपालिका हद्दीतील भाग क्रमांक 10 मधील सर्व व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून परिस्थिती नियंत्रणात असल्याने जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी हा निर्णय घेतला आहे.

शहरात शेती व शेतीशी निगडित वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी पेट्रोल व डिझेल विक्री सुरू राहील. दुकाने व इतर आस्थापना पूर्ववत वेळेनुसार सुरू राहतील. इतर अत्यावश्यक सेवा पूर्ववत सुरू राहतील नागरिकांनी बाहेर पडताना मास्क घालणे, सोशल डिस्टनसिंगचे पालन करणे व कोरोना प्रतिबंधाबाबत वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

ग्रामस्तरीय दक्षता समितीची स्थापना
बाहेरील राज्यातून अथवा जिल्ह्यातून परतणाऱ्या मजुरांना कोरोना प्रतिबंधाच्यादृष्टीने होमक्वॉरंटाईन करणे गरजेचे असल्याने त्यासाठी ग्रामस्तरीय दक्षता समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीत सरपंच अध्यक्ष असतील तर ग्रामसेवक आणि पोलीस पाटील सदस्य असतील.

सदर समिती बाहेरून येणाऱ्या व्यक्तीच्या हातावर होमक्वॉरंटाईनचा शिक्का असल्याचे पाहिल.गावात पथक स्थापन करून अशा व्यक्तींची नियमित तपासणी करण्यात येईल. त्या 14 दिवस घराबाहेर पडणार नाही याची दक्षता घेईल. अशी व्यक्ती बाहेर पडत असल्यास तहसीलदार किंवा पोलीस निरीक्षक याना माहिती देईल. तालुका वैद्यकीय अधिकारी यांचेकडून वैद्यकीय तपासणी करून आजाराची लक्षणे आढळल्यास जिल्हा प्रशासनाला कळवेल आणि कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करेल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.