नंदुरबार : कापूस खरेदी प्रक्रीयेला वेग देऊन दररोज 100 वाहनातील कापसाची खरेदी होईल असे नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले.
शहदा येथील कापूस खरेदी केंद्र आणि कॉटन मीलला भेट दिली. यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासमवेत उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, पोलीस उप अधीक्षक सपकाळे, परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी दयानंद जगताप, तहसीलदार मिलींद कुलकर्णी, गट विकास अधिकारी सी.टी.गोसावी आदी होते.
डॉ.भारुड म्हणाले, शेतकऱ्यांकडील शिल्लक कापसाचे सर्वेक्षण करण्यात यावे. शेवटच्या शेतकऱ्याचा कापूस खरेदी होईपर्यंत ही प्रक्रीया सुरू ठेवावी. योग्य नियोजन करून खरेदी प्रक्रीयेला वेग देण्यात यावा.
जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे भेट देऊन आडत विक्रेत्यांशी चर्चा केली. त्यांनी तहसील कार्यालयातील बैठकीत मनरेगा योजनेचा आढावा घेतला. शेतकऱ्यांचे ग्रुप करून कंपार्टमेंन्ट बंडींगची कामे घेण्यात यावी. सीसीटीची कामे घेताना सोबत वृक्षारोपणाची कामे घेण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले. मानमोडे आणि भुलाणे येथील कामांना डॉ.भारुड यांनी भेट दिली. त्यांच्या हस्ते मजूरांना टोप्यांचे वाटप करण्यात आले. स्थानिक प्रशासनाने या टोप्या उपलब्ध करून दिल्या आहेत.
त्यांनी स्वयंसेवी संघटनांच्या प्रतिनिधींशीदेखील चर्चा केली. कोविड संकटानंतर शासनाच्या विविध योजनांमध्ये स्वयंसेवकांचे चांगले सहकार्य घेता येईल. संकट आणखी काही काळ चालणार असल्याने स्वयंसेवकांनी उत्साह कायम ठेवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. डॉ.भारुड यांनी नगर पालिकेला भेट देऊन पावसाळ्यापूर्वीच्या कामांचा आढावा घेतला.