नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : भविष्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता शहादा, तळोदा, एकलव्य कोविड केअर सेंटर आणि नवापूर येथे ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड-19 बाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अविशांत पंडा, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रघुनाथ भोये, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके उपस्थित होते.
डॉ.भारुड म्हणाले ऑक्सिजन बेड्ससोबत आवश्यक मनुष्यबळ, एक्सरे यंत्र, तंत्रज्ञ यांचेदेखील नियोजन करावे. जिल्ह्यातील खाजगी व शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन सिलींडरच्या मागणीचा आढावा घ्यावा व आवश्यकतेच्या तीनपट पुरवठा होईल याबाबत नियोजन करावे. कोविड हॉस्पिटलसाठी अतिरिक्त एसबीबीएस डॉक्टर्सना प्रशिक्षित करावे.
अक्कलकुवा येथे स्वॅब एकत्रित करण्यासाठी फिरते पथक नेमावे व नवापूर येथे आणखी एक पथक वाढवावे. संपर्क साखळीतील व्यक्तिंचा शोध घेवून त्यांची तपासणी वेळेवर करावी. खाजगी कोविड रुग्णालयाची व्यवस्था शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार होत असल्याबाबत योग्य संनियत्रण करावे. लस विकसित होईपर्यंत कोरोना बाधितांवर उपचार करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात मुलभूत सुविधा विकसीत कराव्यात, असे त्यांनी सांगितले.
स्वॅब तपासणीचे प्रमाण वाढविण्याचा प्रयत्न करावा. मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये जनजागृतीसाठी ध्वनीक्षेपक असलेल्या वाहनाची व्यवस्था करावी. मास्क न घालता बाहेर फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी आणि याबाबतच्या आदेशाचे कटाक्षाने पालन करावे, असेही डॉ.भारुड म्हणाले.
श्री.पाटील यांनी फॅसिलीटी ॲपच्या नोंदी अद्ययावत करण्याबाबत मार्गदर्शन केले. बैठकीस तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.