नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : तहसिलदार भाऊसाहेब थोरात यांनी नंदुरबार तालुक्यातील सुजालपूर, नाशिंदे, बोराळे, आणि कोरीट या गावांना भेट देवून माझे ‘कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेबाबत ग्रामस्थाचे समुपदेशन केले आणि त्यांना आरोग्य तपासणीस सहकार्य करण्याचे आवाहन केले.
जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत ग्रामस्थांमध्ये मोहिमेबाबत गैरसमज असल्याचे समोर आले होते. या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार श्री.थोरात यांनी या गावातील सरपंच आणि ग्रामस्थांशी चर्चा केली. आरोग्य तपासणीमुळे कोरोना व्यतिरिक्त इतरही आजार लक्षात आल्यास त्यावर वेळीच उपचार करता येतील. तसेच कोरोनाची लक्षणे आढळल्यास स्वॅब चाचणी होईल, अन्यथा केवळ माहिती घेण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले. ग्रामस्थानीदेखील आरोग्य तपासणीत सहकार्य करण्याचे मान्य केले.
यावेळी सरपंच उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका आणि गावातील प्रतिष्ठीत नागरीका समवेत बैठक घेवून त्यांना मोहिमे विषयी माहिती देण्यात आली.