नंदुरबार (जिमाका वृत्त): डेंग्यू आजाराला प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी साठवलेल्या पाण्याचे योग्यप्रकारे व्यवस्थापन करावे आणि डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे निर्माण होऊ देऊ नये, तसेच आवश्यक दक्षता बाळगून आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी अपर्णा पाटील यांनी केले आहे.
16 मे हा दिवस राष्ट्रीय डेंग्यू दिन म्हणून साजरा करण्यात येतो. डेंग्यू आजाराविषयी जनतेमध्ये जागृती निर्माण होऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी नागरिकांनी सहकार्य करावे. डेंग्यू आजाराचा प्रसार हा एडिस इजिप्ती या डासांच्या चावण्यापासून होतो. या डासांची उत्पत्ती साठवणूक केलेल्या स्वच्छ पाण्यात होते. नागरीकांनी आपल्या घरातील पाणी साठवणूकीचे भांडे आठवड्यातून एकदा रिकामे व कोरडे करुन भरावे एक दिवस कोरडा पाळण्यात यावा.आपल्या घराच्या आजुबाजूचा परिसर स्वच्छ राहील याची काळजी घ्यावी.
डेंग्यूचे रुग्ण नियमित स्वरुपात आढळत असून डेंग्यू आजाराच्या संख्येत ऑगस्ट, सप्टेंबर नंतर वाढ होतांना दिसते. काही भागात अतिपाऊस,वाढते शहरीकरण, स्थलांतराचे प्रश्न, विविध विकास कामे अशा अनेक कारणामुळे डेग्यू आजाराचे प्रमाणात वाढ होते.
उपाय योजना
डेंग्यू डासांची उत्पत्ती साठलेल्या पाण्यात होत असल्याने पाणी व्यवस्थापन योग्य रितीने केल्यास डासांची निर्मिती व पर्यायाने हिवताप, डेंग्यूचे प्रमाण शहरात व आपल्या गावात निश्चित कमी होईल. यासाठी घराजवळ असलेली नाले वाहते करुन डासोत्पत्ती स्थाने नष्ट करण्यात यावीत. नष्ट करता न येणाऱ्या मोठ्या डासोत्पत्ती स्थानांमध्ये गप्पी मासे सोडण्यात यावीत. पाण्याच्या साठ्यांना घट्ट झाकण बसवावे. घरातील कुलर, फ्रिजचा ड्रिप पॅन नियमित स्वच्छ करावा. गटारी वाहती करावीत आणि छोटे खड्डे व डबकी बुजवावीत. अंगभर कपडे घालावेत. झोपतांना मच्छरदाणीचा, डास प्रतिबंधक साधनांचा वापर करावा.
आजाराची लक्षणे
तीव्र डोकेदुखी, डौळ्यांच्या खोबणीत वेदना, सांधेदुखी, अंगावर पुरळ येणे, भूक मंदावणे, उलट्या होणे, प्रसंगी उलट्यातून रक्त येणे, तोंडाला कोरड पडणे, रक्तमिश्रीत काळसर संडास होणे ही डेंग्यू तापाची लक्षणे आहेत. डेंग्युबाबत लक्षणे आढळल्यास त्वरीत नजीकच्या जिल्हा सामान्य रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन मोफत रक्त तपासणी करावी आणि औषधोपचार घ्यावे.तसेच खाजगी लॅब धारकांनी डेंग्यू रुग्णांचे नमूने जिल्हा रुग्णालयात पाठविण्याची कार्यवाही करावी. डेंग्यू या आजाराचे निश्चित निदानासाठी इलायझा टेस्ट ही परिपूर्ण चाचणी आहे. ही चाचणी जिल्ह्यामध्ये शासकीय जिल्हा रुग्णालयातील सेन्टीनल सेन्टर येथे मोफत करण्यात येते, अशी माहिती श्रीमती. पाटील यांनी दिली आहे.