नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यासाठी कोरोना लसीचे 12410 डोस प्राप्त झाले असून नाशिक येथील आरोग्य विभाग उपसंचालक कार्यालयातील शीतगृहातून विशेष वाहनाने हे डोस जिल्हा परिषद परिसरातील जिल्हा लस भांडार गृह इमारतीत आणण्यात आले.
जिल्ह्यात 16 जानेवारीपासून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणास सुरूवात होणार आहे. तोपर्यंत हे लसीचे डोस भांडारातील शीत पेटीत 2 ते 8 अंश तापमानात ठेवण्यात येणार आहेत व या ठिकाणाहून तालुका स्तरावर लसींचे वितरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यात लस ठेवण्यासाठी 7 शितपेट्या असून आणखी 24 शीतपेट्या लवकरच प्राप्त होणार आहेत, अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके यांनी दिली.