नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यत पोहचविण्यासाठी कृषि विभाग, कृषि विज्ञान केंद्र आणि कृषि महाविद्यालय नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने 21 जून ते 1 जुलै 2021 या कालावधीत जिल्ह्यात कृषि संजीवनी मोहिम सुरु करण्यात येणार आहे.
मोहिमेच्या माध्यमातून प्रत्येक कार्यालयीन दिवशी शेतकऱ्यांना कृषि विद्यापिठाच्या संशोधित व अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 21 जून रोजी बीबीएफ लागवड तंत्रज्ञान ( रुंद वरंबा सरी पद्धती ), 22 जून रोजी बीज प्रक्रिया, 23 जून रोजी जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापर, 24 जून रोजी कापुस एक गाव एक वाण, 25 जून रोजी विकेल ते पिकेल, 28 जून रोजी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड व तंत्रज्ञान प्रसार, 29 जून रोजी तालुक्यातील दोन पिकात उत्पादकता वाढीसाठी रिसोर्स बँकेतील शेतकऱ्यांचा सहभाग, 30 जून रोजी जिल्ह्यातील महत्वाच्या पिकांच्या किड व रोग नियंत्रणाच्या उपाययोजनेची माहिती देण्यात येईल. 1 जुलै 2021 रोजी कृषि दिनी या मोहिमेचा समारोप कार्यक्रम होईल.
या मोहिमेदरम्यान कृषि विभागाच्या महत्वाच्या योजनांची माहिती व्हॉट्सॲप मिळविण्यासाठी सुविधा विकसित करण्यात आली आहे. मोहिमेत शेतकऱ्यांच्या यशोगाधाही दाखविण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कृषि संजीवनी मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी एन.बी.भागेश्वर यांनी केले आहे.