नंदुरबार : आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांच्या निर्देशानुसार राज्यात व परराज्यात विविध ठिकाणी अडकलेल्या आदिवासी मजूर आणि विद्यार्थ्यांना जिल्ह्यात आणण्यासाठी आदिवासी प्रकल्प कार्यालयातर्फे नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
नियंत्रण कक्ष जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाच्या संपर्कात राहणार असून तेथून मिळालेल्या आदिवासी व्यक्तींच्या माहितीच्या आधारे वाहन व्यवस्था करून त्यांना जिल्ह्यातील त्यांच्या गावी पोहोचविण्यात येणार आहे. यासाठी तळोदा आणि नंदुरबार प्रकल्प कार्यालय परस्पर समन्वयाने कार्य करीत आहे. राज्यातील तसेच परराज्यात असलेल्या जिल्ह्यातील आदिवासी नागरिकांची माहिती संकलनाचे कामदेखील करण्यात येत आहे.
पुणे येथून 480 व्यक्तींना परत आणण्यात येत असून त्यापैकी जिल्ह्यातील 409 मजूर नंदुरबारकडे 17 बसेसद्वारे येत आहेत. त्यात नंदुरबार 45,नवापुर 15,शहादा 88,तळोदा 32,धडगाव 120 तर अक्कलकुवा तालुक्यातील 109 व्यक्तींचा समावेश आहे. सध्याच्या लॉकडाऊन स्थितीत स्थलांतरीत मजूर राज्यात व परराज्यात विविध ठिकाणी अडकलेला असून या कालावधीत रोजगार नसल्याने त्यांच्याकडे उदरनिर्वाहासाठी व स्थलांतरित ठिकाणाहून मूळगावी येण्यासाठी पैसे उपलब्ध नाही. या आपत्तीच्या कालावधीत मजुराना मूळ गावी परतण्यासाठी आदिवासी विकास विभागाने 17 बसेस उपलब्ध करुन दिल्या आहे. सदर बसेस संपुर्ण सॅनेटायझ करण्यात आल्या प्रत्येक बसमध्ये 12 मजूर बसविण्यात आले आहेत. प्रवासादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात येत आहे. प्रवासादरम्यान भोजनाची सोयही आदिवासी विकास विभागातर्फे करण्यात येत आहे.
सर्व 409 मजूराची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असुन त्यांना जिल्ह्यात आल्यावर होम क्वॉरटाईन करण्यात येणार आहे. त्या सर्व मजूरांना जिल्हा क्रिडा संकुल,नंदुरबार येथे आणण्यात येणार आहे. या ठिकाणी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय,नंदुरबार व तळोदा यांच्या समन्वयातुन तालुका निहाय सहा कक्षाची स्थांपना करण्यात आलेली आहे. त्यासाठी दोन्ही प्रकल्पातील 40 कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सर्वांना तेथून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसद्वारे, तसेच जेथे बस जाणार नाही तेथे खाजगी वाहनाद्वारे मजुरांना त्यांच्या मुळगावी पाठविण्यात येणार आहे.
नियत्रंण कक्षात नंदुरबार,नवापुर, शहादा तालुक्यासाठी समन्वय अधिकारी सहायक प्रकल्प अधिकारी म्हणून प्रदीप देसाई (9403969826) यांची नेमणूक करण्यात आली आहे. तळोदा, अक्कलकुवा, धडगावसाठी सहायक प्रकल्प अधिकारी अमोल मेतकर (9850687833) यांची नेमणूक करण्यात आली आहे. राज्यात किंवा परराज्यात स्थलांतरीत किंवा लॉकडाउनमध्ये अडकलेल्या आदिवासी नागरिकांनी वरील क्रमांकावर किंवा जिल्हा नियंत्रण कक्षाशी (02564-210006) संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.