नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : बाजारात रेमडिसीवीर इंजेक्शनचा तुटवडा असल्याने आणि त्या पार्श्वभूमीवर जनतेची गैरसोय दूर होणे गरजेचे असल्याने जिल्हा प्रशासनातर्फे रोटरी वेलनेस सेंटरला शासकीय अथवा त्यापेक्षा कमी दराने वितरीत करण्यासाठी उसनवारी तत्वावर 1000 रेमडिसीवीर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत.
जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयातील कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी रेमडिसीवीर इंजेक्शन आवश्यक असल्याने मंगळवारी झालेल्या कोविड आढावा बैठकीत खाजगी रुग्णालयातील रुग्णांसाठी रेमडिसीवीर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी दिले होते. शासकीय रुग्णालयांसाठी इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याने त्यानुसार पुढील व्यवस्था होईपर्यंत खाजगी रुग्णालयातील रुग्णांसाठी हे इंजेक्शन उपलब्ध्ा करून देण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या होत्या.
सदर इंजेक्शन कोविड-19 रुग्णालय म्हणून मान्यता देण्यात आलेल्या रुग्णालयातील रुग्णांसाठी वापरण्यात येणार आहे. रेमडिसीवीर सी व डी वर्गातील रुग्णांना डॉक्टरांच्या चिठ्ठीनुसार (प्रिस्क्रीप्शन) देण्यात येणार आहे. इंजेक्शन दिलेल्या रुग्णांची माहिती जिल्हा रुग्णालयात तातडीने जमा करावयाची आहे. इंजेक्शनचे वितरण मुळ शासकीय किंमतीनुसार किंवा त्यापेक्षा कमी किंमतीने करण्यात येणार आहे. रुग्णांवर वेळेवर उपचार होऊन त्यांचा जीव वाचविण्याच्यादृष्टीने हे इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे.
आरोग्य उपसंचालक नाशिक यांनीदेखील खाजगी रुग्णालयात रेमडिसीवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवल्यास शासनाने दिलेल्या ट्रिटमेंट प्रोटोकॉलनुसार दाखल रुग्णास त्याचा जीव वाचविण्याच्या उद्देशाने उसनवारी तत्वावर इंजेक्शन देण्याविषयी सूचना दिलेल्या आहेत. तसेच खाजगी वैद्यकीय व्यावसायिकाकडे ते उपलब्ध झाल्यानंतर परत घेण्याच्या सुचनादेखील दिलेल्या आहेत. त्यानुसार साठा उपलब्ध झाल्यावर एवढ्याच संख्येने इंजेक्शन परत करण्याच्या सूचनादेखील संबंधित संस्थेला देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात रेमडिसीवीर इंजेक्शनचा तुटवडा लक्षात घेता पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकचा साठा मिळविण्यासाठी प्रशासनाचा पाठपुरावा सुरू आहे.