नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील युवांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्यकरण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी शासनामार्फत जिल्हास्तरावर एक युवक, एक युवती, एक नोंदणीकृत संस्थेला जिल्हा युवा पुरस्कार देण्यात येतो.
सन 2018-2019, 2019-2020 व 2020-2021 या तीन वर्षाकरीता जिल्हा युवा पुरस्कार देण्यात येणार असून पुरस्कारासाठी अर्जदार युवक, युवतीचे वय पुरस्कार वर्षातील 1 एप्रिल रोजी 13 वर्ष पूर्ण व 31 मार्च रोजी 35 वर्ष पर्यंत असावे. दोन्ही पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या युवक,युवती व युवा विकासाचे कार्य करणाऱ्या संस्थांची 1 एप्रिल ते 31 मार्च कालावधीतील गत तीन वर्षाची कामगिरी विचारात घेतली जाईल.
अधिक माहिती क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या http://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून विहित नमुन्यातील अर्ज 8 ते 18 मार्च 2021 या कालावधीत जिल्हा क्रीडा कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल परिसर, खामगांव रोड, साक्री नाका, नंदुरबार येथे कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहे.( महेंद्र वसावे 7588737628 ).
विहित नमुन्यात भरलेला अर्ज व आवश्यक त्या छायांकित कागदपत्रे साक्षांकित करुन , पासपोर्ट फोटो, कार्याची पीपीटी तयार करुन पुस्तिकेच्या स्वरुपात एकत्रित बंद लिफाप्यात 24 मार्च 2021 पर्यंत सादर करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी केले आहे.