नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): विविध अभ्यासक्रमांचे प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अडचण होऊ नये म्हणून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नंदुरबारच्या यांच्या वतीने अपूर्णता असलेल्या प्रकरणात पूर्तता करण्यासाठी विशेष मोहीमचे आयोजन करण्यात आले असल्याचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती प्राची वाजे यांनी एका प्रसिध्दी पत्रकानुसार कळविले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत नंदुरबार जिल्ह्यात राबविलेल्या मंडणगड पॅटर्णनुसार 2 हजार 500 शैक्षणिक प्रकरणे समितीकडे प्राप्त झालेली होती, त्यापैकी 2 हजार 450 प्रकरणांवर निर्णय घेण्यात आलेला असून जिल्हयात मंडणगड पॅटर्णनुसार सर्व तालुक्यांमध्ये 12 शिबिरे घेण्यात आलेले आहेत.
“ राजर्षी शाहू महाराज जयंती पर्व ” अंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यातील इयत्ता 12 वी विज्ञान शाखेतील सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहिम सुरु करण्यात आली आहे. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नंदुरबार कार्यालयात जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रकरणे त्रृटी पुर्ततेअभावी अर्जदारस्तरावर प्रलंबित आहेत. अशा अर्जदारांनी नोंदणी केलेल्या ई-मेलवर CCVIS-II प्रणालीव्दारे व त्रूटीचे पत्र देऊन कळविण्यात आल्या आहेत. तथापि, अर्जदारांनी कागदपत्रांची पुर्तता केलेली नसल्यामुळे प्रकरणे प्रलंबित आहे.
अशा प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी अर्जदारांनी ई-मेलवर कळविण्यात आलेल्या त्रुटीसंह व मुळ कागदपत्रांसह समिती कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 10.00 ते सायंकाळी 04.00 या वेळेत उपस्थित राहावे.
अर्जदारांकडून त्रृटी पुर्तता न केल्यास त्यांच्या प्रकरणांवर नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे. कोणत्याही अर्जदाराने त्रयस्थ व्यक्तीकडे सपंर्क करु नये व त्रयस्थ व्यक्तिीच्या अमिशास बळी पडू नये. असे आवाहनही संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव श्रीमती वाजे केले आहे.