नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण विभागातंर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘जागरुक पालक, सुदृढ बालक’ अभियानाची जिल्ह्यात प्रभावी अंमजबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी जिल्हास्तरीय कृतीदल समितीच्या बैठकीत दिल्यात.
जागरुक पालक, सुदृढ बालक बाल आरोग्य तपासणी अभियानांची जिल्हास्तरीय कृतीदल समितीची बैठक आज रंगावली सभागृहात जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गोविद चौधरी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.के.डी.सातपुते, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती खत्री म्हणाल्या की, ‘जागरुक पालक, सुदृढ बालक’ अभियांनातंर्गत नंदुरबार जिल्ह्यातील 0 ते 18 वर्ष वयोगटातील सर्व बालक, किशोरवयीन मुलाची सर्वांगीण आरोग्य तपासणी करण्यात येणार असून यासाठी आरोग्य विभाग, एकात्मिक बाल विकास विभाग, वैद्यकीय व औषधी द्रव्ये विभाग, शिक्षण विभाग, आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय, नगर विकास, पंचायतराज तसेच समाज कल्याण विभागाच्या समन्वयाने काम करुन हे अभियांन यशस्वी करावे.
या अभियानातंर्गत जिल्ह्यातील 1 हजार 894 शासकीय, निमशासकीय शाळा 180, खाजगी व कनिष्ठ महाविद्यालय, 2 हजार 588 अंगणवाड्या, 3 बालगृह व अनाथालय, 10 दिव्यांग शाळा, अशा एकूण 4 हजार 675 शाळेतील 5 लाख 46 हजार 82 विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येईल. या अभियानासाठी ग्रामीण भागात उपकेंद्रनिहाय 290 पथक व शहरी भागात 20 असे एकूण 310 पथक नियुक्त केले आहे. या पथकामार्फत दररोज 150 मुला-मुलींची तपासणी केली जाईल. पथकासोबत स्थानिक आशा व अंगणवाडी सेविका राहणार आहे. या अभियानात प्रत्येक बालकाची काळजीपुर्वक तपासणी होणे आवश्यक आहे. याकरीता सर्व नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शिंदे म्हणाले की, या मोहिमेत 0 ते 18 वयोगटातील सर्व बालकांची तपासणी होणार आहे. यासाठी प्रथम, द्वितीयस्तर पथके व बाल आरोग्य तपासणी पथक स्थापन केले असून प्रत्येक तपासणी पथकाने संपुर्ण दिवसात किमान 150 विद्यार्थ्यांची तपासणीचे नियोजन करण्यात आले आहे. या तपासणीत 1 वर्ष ते 6 वर्ष वयोगटातील बालकांचे वजन व उंची मोजून बालकांचे सॅम व मॅम श्रेणी काढण्यात येईल. तसेच नवजात बालकांमधील जन्मजात व्यंग ओळखणे तसेच सर्व वयोगटातील बालकांची तपासणी करुन रक्ताक्षय, डोळ्यांचे आजार ,गलगंड, दंतविकार, ह्दयरोग, क्षयरोग, कुष्ठरोग, अस्थमा, एपिलेप्सी इत्यादी आजाराच्या संशयित रुग्णांना ओळखून त्यांच्या वर त्वरीत उपचार करुन आजाराच्या तीव्रतेनुसार पुढील योग्य उपचार व शस्त्रक्रिया करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, खाजगी रुग्णालयमध्ये संदर्भीत करण्यात येणार आहे.
या मोहिमेत नवजात बालकासोबत आलेल्या मातेस स्तनपान, पोषण आहार,मानसिक आरोग्य, व्यसनमुक्ती यांचे समुपदेशन ही करण्यात येणार आहे. या तपासणीसाठी आवश्यक साधणे व उपकरणे उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. बैठकीस सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी तसेच विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.