नंदुरबार : जिल्ह्यात कृषी विभागाकडील पावसाळ्यापूर्वी जलसंधारणाची व जलसंपदा विभागाकडची अत्यावश्यक कामे तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील जलसंपदा विभागाच्या प्रकल्पातून पिण्यासाठी, सिंचनासाठी व औद्योगिक पाणीपुरवठ्याचे काम सुरळीतपणे सुरू ठेवावे. पाणीपुरवठा करण्यासाठी तसेच सिंचन व्यवस्थापन करण्यासाठी व बंद नलिका, कालवे वितरण प्रणालीचे परिचलन करणाऱ्या किमान आवश्यक क्षेत्रीय अधिकारी आणि वाहनांना अंतर्गत अनुमती पत्र संबंधित अधीक्षक अभियंत्यांनी निर्गमित करावे.
क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी कोरोनाचा प्रसार व बाधा होऊ नये यासाठी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. शेतकऱ्यांशी एकत्रित बैठकांचे आयोजन करण्यात येऊ नये. पावसाळ्यापूर्वी करावयाची देखभाल दुरुस्ती व धरण सुरक्षेची कामे त्वरेने हाती घ्यावीत. अशी कामे करताना मजूरांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे ही कंत्राटदाराची जबाबदारी राहील. कंत्राटदारांनी या कामासाठी पुरेशी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून द्यावी. जलसंपदा विभागाकडची वाहने अन्य यंत्रणांनी परस्पर अधिग्रहीत करू नये.
बांधकामावरील मजूरांना बांधकामाचे ठिकाण सोडून इतरत्र फिरता येणार नाही, याची जबाबदारी साईट इंजिनिअर यांची असेल. राज्याच्या मुख्य सचिवांकडील 17 एप्रिल 2020 अन्वये अटी शर्तीच्या अधीन राहून ही कामे तात्काळ पूर्ण करावीत. संबंधित विभागाचे जिल्हास्तरीय प्रमुख अधिकाऱ्यांनी कर्मचारी व वाहने यांच्यासाठी त्यांच्यास्तरावरून आदेश काढावेत व त्याची एक प्रत पोलीस विभागाकडे द्यावी. कर्मचाऱ्यांना आदेशाची प्रत आणि ओळखपत्र जवळ बाळगण्याच्या सूचना देण्यात याव्यात , असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.