नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): सुधारीत गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेत पात्र लाभार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ.उमेश पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
गोवर्धन गोवंश सेवा केंद्र स्थापन करणेसाठी जिल्ह्यातील नवापूर वगळता इतर तालुक्यात गोवंश सेवा संस्थांकडून विहित नमुन्यातील अर्ज 19 जुलै, 2023 पर्यंत मागविण्यात आले आहेत. दुग्धोत्पादनास, शेतीकामास, पशुपैदाशीस, ओझी वाहण्याच कामास उपयुक्त नसलेल्या/ असलेल्या गाय,वळू, बैल व वय झालेले गोवंश यांचा सांभाळ करणाऱ्या सेवा केंद्रासाठी गोवर्धन गोवंश सेवा केंद्र ही नवीन योजना शासनाने सुरु केली आहे. या योजनेतंर्गत पात्र गोशाळांना पशुधनाच्या संख्येनुसार दोन टप्प्यात अनुदान देण्यात येईल.
या योजनेसाठी नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार, शहादा,तळोदा, अक्कलकुवा व धडगांव तालुक्यातील एका गोशाळांची निवड करण्यात येईल. योजनेच्या लाभ व पात्रतेच्या अटी, शर्ती व योजनेच्या अधिक माहितीसाठी व अर्जाचा विहित नमुन्यासाठी संबंधित तालुक्यातील सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन किंवा पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती किंवा जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय,नंदुरबार यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, डॉ.पाटील यांनी केले आहे.