नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : ग्रामीण आणि दुर्गम भागातील गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचून प्रशासनाने शिधापत्रिकासारख्या मुलभूत सुविधा उपलब्ध करून देणे गरजचे आहे आणि महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने यासाठी चांगले प्रयत्न केले आहेत, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले.
नंदुरबार तालुक्यातील फुलसरा गावात महाराजस्व अभियानांतर्गत विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध दाखल्याचे वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, उपायुक्त अर्जुन चिखले, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अविशांत पंडा, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, उपजिल्हाधिकारी बबन काकडे, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, तहसिलदार उल्हास देवरे , सरपंच हिना वळवी, आदी उपस्थित होते.
श्री.गमे म्हणाले, ग्रामीण भागात वयोवृद्ध महिलांना संजय गांधी निराधार योजनेसारख्या योजनांचा लाभ देणे महत्वाचे आहे. ग्रामीण भागातील गरजा लक्षात घेऊन तेथील नागरिकांना सुविधा देण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेणे आणि त्यांच्या मदतीला धावून जाणे गरजेचे आहे. नंदुरबार जिल्हा प्रशासनाने यासाठी स्तुत्य उपक्रम राबविला आहे. महाराजस्व अभियानांतर्गत ग्रामीण भागात अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री.गमे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना नवीन शिधापत्रिका, संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मंजूर लाभार्थी प्रमाणपत्र, उत्पन्नाच्या दाखल्याचे वाटप करण्यात आले. श्री.गमे यांनी प्रशासनाच्या उपक्रमाचे कौतुक केले.