नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना चांगल्या दर्जांचे बियाणे, रासायनिक खते,कीटकनाशके, आदी कृषी निविष्ठा उपलब्ध करुन देण्यासाठी योग्य नियोजन करावे अशा सूचना जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय कृषि निवष्ठा सनियंत्रण समितीची बैठक संपन्न झाली त्यावेळी त्याबोलत होत्या. बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश भागेश्वर, जिल्हा कृषी अधिकारी एल.डी.भोये, महाबिजचे जिल्हा व्यवस्थापक बी.जी.कोटकर, मोहिम अधिकारी महेश विसपुते, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नरेंद्र पाडवी, पंचायत समितीचे कृषि अधिकारी योगेश हिवराळे, एकनाथ कदम आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती खत्री म्हणाल्या की, खरीप हंगाम 2022-2023 साठी शेतकऱ्यांना उपलब्ध करुन येणाऱ्या बियाणे चांगल्या दर्जाची असावेत. प्रत्येक विक्रेत्याने साठा तसेच दर दर्शविणारे फलक दर्शनी भागात लावावेत. साठा रजिष्टर नोंदवह्या अद्यावत ठेवाव्यात. रासायनिक खते विक्रेत्यांनी पीओएस मशिनद्वारेच खताची विक्री करावी. खताची विक्री शासकीय दरानेच करावी. जादा दराने विक्री बियाणे,खते तसेच कृषि निविष्ठा विक्री करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी. युरीयाचा वापर कमी होणसाठी नॅनो युरियाचा वापर वाढविण्यावर भर देण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी. त्यासाठी प्रत्येक दुकानात नॅनो युरिया वापरा बाबतचे जनजागृतीपर फलक लावण्यात यावेत. शेतकऱ्यांच्या मागणी नुसार बियाणे विक्रेत्यांनी हिरवळीच्या खताच्या बियाणे उपलब्ध करुन द्यावे. सेंद्रीय खताचा कंपोस्ट, गांडुळ खत, जिवाणु खते वापरण्यासाठी जनजागृती करावी.
यावेळी श्री.भागेश्वर म्हणाले की, खरीप हंगाम 2022 साठी भात,मका,ज्वारी,बाजरी,सोयाबीन व इतर बियाण्यांसाठी 22 हजार 620 क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. तर बी.टी कापूस बियाण्यासाठी 6 लाख 25 हजार पाकिटांची मागणी नोंदविण्यात आली आहे. जिल्ह्यासाठी खरीप हंगामासाठी 3 हजार 30 मे.टन युरिया व 590 मे.टन डि .ए.पी. संरक्षितसाठा मंजूर केला आहे. खरीप हंगामासाठी 1 लाख 34 हजार 800 मे.टन रासायनिक खताची मागणी करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. याबैठकीस खते,बियाणे विक्रेते व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.