नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) -जिल्ह्यातील प्रत्येक बँक शाखेच्या व्यवस्थापकांनी खरीप पीक कर्ज वाटपाचे प्रमाण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीला स्टेट बँक इंडियाचे क्षेत्रिय प्रबंधक सुरजितकुमार सहा, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक जयंत देशपांडे, ‘नाबार्ड’ चे जिल्हा व्यवस्थापकीय संचालक प्रमोद पाटील, जिल्हा सहकार उपनिबंधक भारती ठाकूर आदी उपस्थित होते.

श्रीमती खत्री म्हणाल्या की, खरीप हंगाम 2022 साठी जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज उपलब्ध करुन देवून 100 टक्के खरीप कर्ज वाटप होईल याकडे बँकेने विशेष प्रयत्न करावे. यासाठी बँकेने अधिकाधिक पीक कर्जाचे मेळावे घ्यावेत. अधिकाधिक वनपट्टेधारकांना पीक कर्जाचे वाटप करावेत. महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्यासाठी आधार प्रमाणिकरण राहीलेल्या लाभार्थ्यांचे आधार प्रमाणिकरणाचे काम त्वरीत पुर्ण करावे. दुर्गम भागातील धडगाव, अक्कलकुवा आणि मोलगी भागात बँक सेवा देण्यासाठी प्रयत्न करावे. या भागातील बॅकेस येणाऱ्या वीज व इंटरनेटची समस्या सोडविल्या जातील. बँकांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, पीएम किसान योजना, मुद्रा योजनेचा लाभ लाभार्थ्यांना द्यावा. बँकेच्या दर्शनी भागावर कर्ज प्रक्रियांची माहिती प्रदर्शित करावी.

श्री.जयंत देशपाडे म्हणाले की, खरीप हंगामासाठी जिल्ह्यास 603 कोटी 41 लाख रुपयाचे उद्दीष्ट देण्यात आले असून आज पर्यंत 160 कोटी 4 लाख रुपयाचे पीक कर्जांचे वाटप करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. बैठकीला विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.