नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हा परिषद नंदुरबार व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना लसीकरण जनजागृती अभियान आयोजित करण्यात आला असून त्यांचा शुभारंभ जिल्हाधिकारी महेश पाटील यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.
जिल्हा परिषद, नंदुरबार येथे झालेल्या या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण, जिल्हा सल्लागार युनिसेफ डॉ.हर्षदा पवार तसेच जिल्हा परिषदेतील अधिकारी कर्मचारी तसेच युनिसेफचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या जनजागृतीपर सहा वाहनामार्फत जिल्हा परिषद व युनिसेफच्या मदतीने अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील दुर्गम भागातील ज्या भागात लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. अशा ठिकाणी आदिवासी बोलीभाषेत लसीकरणाबाबत नागरिकांचे समुपदेशन, लसीकरणाबाबत अफवा,शंकेंचे निरसन ध्वनीक्षेपक आणि फलकाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. हा उपक्रम चांगला असून त्यामुळे लसीकरणास प्रतिसाद वाढण्यास मदत होईल असे श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले.