नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : कोविड-19 विषाणूच्या प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी राज्य शासनाने व केंद्र सरकारने वेळोवेळी निर्धारीत केलेल्या कोविड अनुरुप वर्तनाच्या अटी व शर्तींचे नागरिकांनी पालन करावे. असे आवाहन जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.

संपूर्ण लसीकरण आवश्यक

नव्या नियमानुसार कोणत्याही कार्यक्रमाच्या आयोजनाशी संबंधित असलेल्या सर्व व्यक्ती, सर्व सेवा देणारे व सहभागी होणाऱ्या व्यक्ती (खेळाडू, अभिनेते इत्यादी) कार्यक्रमस्थळी येणारे व्यक्ती, पाहुणे, ग्राहक याचे संपूर्ण लसीकरण झालेले असावे. कोणतेही दुकान, आस्थापना, मॉल, समारंभ, मेळावे इत्यादी ठिकाणी संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींद्वारे व्यवस्थापन केले पाहिजे. त्याबरोबर अशा ठिकाणी येणारे सर्व अभ्यागत, ग्राहक यांचे संपूर्ण लसीकरण झालेले असावे.

सर्व सार्वजनिक परिवहन सेवांमध्ये लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच परवानगी असेल. यासाठी राज्य शासनाने तयार केलेला युनिव्हर्सल पास किंवा छायाचित्र असलेले वैध ओळखपत्र असलेले ‘कोविन प्रमाणपत्र देखील’ त्यासाठी वैध पुरावा मानले जाईल. १८ वर्षापेक्षा कमी वयाच्या नागरिकांसाठी इतर शासकीय संस्थेने किंवा शाळेने दिलेले छायाचित्र ओळखपत्र आणि वैद्यकीय कारणांमुळे ज्या व्यक्ती लस घेऊ शकत नाहीत त्या व्यक्तींसाठी, प्रमाणित वैद्यकीय व्यावसायीकांकडील प्रमाणपत्र प्रवेशासाठी कागदोपत्री पुरावा म्हणून वापरता येईल. ज्याठिकाणी सर्वसामान्य जनतेतील कोणतीही व्यक्ती भेट देत नाही अशी कार्यालये व इतर आस्थापना तसेच खाजगी परिवहन सेवा यांच्यासाठी संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तीसाठी त्या खुल्या असण्याची अट नसली तरी, त्यांना देखील संपूर्ण लसीकरण करणे आवश्यक राहील.

महाराष्ट्र, जिल्ह्यात प्रवास

कोणत्याही आंतरराष्ट्रीय ठिकाणांवरून राज्यात, जिल्ह्यात येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी केंद्र शासनाने केलेल्या सूचना लागू राहतील. राज्यात येणाऱ्या सर्व देशांतर्गत प्रवाशांचे एकतर यात यापुढे व्याख्या केल्यानुसार संपूर्ण लसीकरण केले जाईल किंवा ७२ तासांसाठी वैध असलेली आरटी-पीसीआर चाचणी प्रमाणपत्र असणे आवश्यक असेल.

कार्यक्रम, समारंभामधील उपस्थितीबाबत निर्बंध

एखाद्या बंदीस्त ठिकाणी होत असलेल्या कार्यक्रमास, चित्रपटगृहात, नाट्यगृहात, मंगल कार्यालयात, सभागृहात, इत्यादी हॉलमध्ये तेथील क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीस परवानगी असेल. संपूर्ण  खुल्या असलेल्या जागांच्या बाबतीत, कोणत्याही सभारंभासाठी किंवा संमेलनासाठी तेथील जागेच्या क्षमतेच्या 25टक्के लोकांना परवानगी दिली जाईल. अशा ठिकाणांच्या बाबतीतील क्षमता, औपचारिकपणे आधीच निश्चित केलेली नसेल तर संबंधित घटना व्यवस्थापक यांना अशी क्षमता ठरवण्याचा अधिकार असेल. जर वरील नियमांनुसार कोणत्याही संमेलनासाठी (मेळाव्यासाठी) उपस्थित असलेल्या एकूण लोकांची संख्या १ हजारांपेक्षा अधिक असेल तर, अशा बाबतीत स्थानिक प्राधिकरणाला त्याची माहिती द्यावी लागेल आणि संबंधित घटना व्यवस्थापक, अशा कोणत्याही संमेलनाचे निरीक्षक म्हणून पर्यवेक्षण करण्यासाठी त्यांचे प्रतिनिधी पाठवील आणि तेथे कोविड अनुरूप वर्तनाचे काटेकोरपणे अनुपालन केले जात असल्याची खात्री करतील. कोविड अनुरूप वर्तनाचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले तर संबंधित घटना व्यवस्थापक यांना सदर कार्यक्रम पूर्णतः किंवा अंशत: बंद करण्याचे अधिकार असेल.

लसीकरणाची व्याख्या

संपूर्ण लसीकरणाची व्याख्या पुढीलप्रमाणे करण्यात आली आहे. लसीच्या दोन्हीही मात्रा (डोस) घेतल्या आहेत आणि दुसरी मात्रा (डोस) घेतल्यानंतर १४ दिवस झालेले आहेत अशी कोणतीही व्यक्ती असा आहे. ज्यामुळे त्याला किंवा तिला लस घेण्यास मुभा नाही आणि त्या व्यक्तीकडे तशा अर्थाचे मान्यताप्राप्त डॉक्टराकडील प्रमाणपत्र आहे अशी कोणतीही व्यक्ती  असा आहे. किंवा कोणतीही १८ वर्षापेक्षा कमी वयाची व्यक्ती असा आहे.

कोविड अनुरूप वर्तनविषयक नियम

नेहमी योग्य पध्दतीने मास्क परिधान करावा. (रूमालाला मास्क समजले जाणार नाही आणि रूमाल वापरणारी व्यक्ती दंडास पात्र असेल) जेथे जेथे, शक्य असेल तेथे, नेहमी सामाजिक अंतर (6 फूट अंतर) राखावे. वेळोवेळी साबणाने किंवा सॅनिटायझरने वारंवार व स्वच्छपणे हात धुवावे. खोकतांना किंवा शिकतांना, टिश्यू पेपरचा वापर करून तोंड व नाक झाकावे आणि वापरलेले टिश्यू पेपर नष्ट करावे, जर एखाद्याकडे टिश्यू पेपर नसेल तर, त्याने स्वत:चा हात नव्हे तर, हाताचा वाकवलेला कोपर नाका तोंडावर ठेवून खोकावे व शिकावे. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका. कोणालाही शारीरिक स्पर्श न करता, नमस्कार, अभिवादन करावे.

नियमांचे पालन न करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना दंड

कोविड नियमांचे पालन न करणा-या व्यक्ती तसेच संस्था, आस्थापना या दंडास पात्र असतील. कोविड़ अनुरूप वर्तनाचे पालन न करणान्या कोणत्याही व्यक्तीला नियम मोडल्याच्या प्रत्येक प्रसंगी 500 रुपये इतका दंड करण्यात येईल. अभ्यागत, ग्राहक, इत्यादीवर कोविड अनुरूप वर्तन ठेवणे अपेक्षित आहे अशा संस्थेच्या किंवा आस्थापनेच्या कोणत्याही जागेत किंवा परिसरात जर एखाद्या व्यक्तीने नियम मोडल्याचे दिसून आले तर, त्या व्यक्तीवर दंड लादण्या व्यतिरिक्त, अशा संस्थाना किंवा आस्थापनांना सुद्धा 10 हजार रुपये इतका दंड करण्यात येईल. जर एखाद्या संस्थेने किंवा आस्थापनेने स्वतःच कोविड अनुरूप वर्तनाचे पालन करण्यात कसूर केली तर ती प्रत्येक प्रसंगी 50 हजार  इतक्या दंडास पात्र असेल.

वारंवार कसूर केल्यास, एक आपत्ती म्हणून कोविड-१९ ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत ती संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येईल. जर कोणत्याही टॅक्सीमध्ये किंवा खासगी वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनात किंवा कोणत्याही बसमध्ये, कोविड अनुरूप वर्तनात कसूर केली जात असल्याचे आढळून आले तर, कोविड अनुरूप वर्तनात कसूर करणाऱ्या व्यक्तींना 500 रुपये इतका दंड करण्यात येईल. तसेच सेवा पुरविणारे वाहनचालक, मदतनीस, किंवा वाहक यांना देखील 500 रूपये इतका दंड करण्यात येईल. बसेसच्या बाबतीत, मालक परिवहन एजन्सीस, कसुरीच्या प्रत्येक प्रसंगी, 10 हजार  रुपये इतका दंड करण्यात येईल. वारंवार कसूर केल्यास, एक आपत्ती म्हणून कोविड-१९ ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत मालक एजन्सीचे लायसन काढून घेण्यात येईल किंवा तिचे परिचालन बंद करण्यात येईल.

राज्य शासनाने व केंद्र सरकारने वेळोवेळी निर्धारित केलेल्या कोविड अनुरूप वर्तनाचे (CAB), सेवा प्रदाते, परिवास्तुंचे (जागांचे) मालक, परवानाधारक, आयोजक, इत्यादींसह सर्वांनी तसेच सर्व अभ्यागत, सेवा घेणारे, ग्राहक, अतिथी, इत्यादींनी काटेकोर पालन केले पाहिजे, यांचे उल्लंघन केल्यास कोविड अनुरूप वर्तनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

00000